अधिकारी-नेत्यांमधील बाचाबाचीनंतर पालामची बाजारपेठ कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:39 PM2020-02-21T13:39:14+5:302020-02-21T13:44:13+5:30
बाचाबाचीनंतर नेत्यांवर सरकारी कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल
पालम : येथील तहसील कार्यालयामध्ये 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता अधिकारी व नेत्यामधला वाद आता विकोपाला गेला आहे तहसीलदार ज्योती चव्हाण यांच्या विरोधात पालम शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे तर सरकारी पक्षाकडून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पालम तहसील कार्यालयात अधिकारी आणि पुढाऱ्यांमध्ये खडाजंगी
गुरुवारी तहसील कार्यालयात भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य गणेशराव रोकडे रासपा नेते सिताराम राठोड व तहसीलदार ज्योती चव्हाण यांच्यात बाचाबाची झाली होती. चार तास तहसील कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा वाद शांत होईल असे वाटत असताना दोन्ही बाजूंनी एकमेकांना आव्हान देण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून तहसीलदार ज्योती चव्हाण व नायब तहसीलदार मंदार इंदोरीकर या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करावे या मागणीसाठी पालमची बाजारपेठ कडकडीत बंद करण्यात आली. यावेळी व्यापाऱ्यांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली.
तर दुसर्या बाजूला 20 फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास नायब तहसीलदार मंदार इंदोरीकर यांच्या फिर्यादीवरून गणेश रोकडे, सिताराम राठोड व अन्य एक अशा तिघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड यांच्याकडे देण्यात आलेला आहे. मात्र प्रशासन व नेत्यांमधील वाद विकोपाला गेल्याने शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.