परभणीत उत्साहात पार पडला पालखी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:29 AM2019-12-23T00:29:04+5:302019-12-23T00:29:32+5:30
संत रंगनाथ महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी शहरातून पालखी सोहळा काढण्यात आली़ या सोहळ्यात आर्यवैश्य समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : संत रंगनाथ महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी शहरातून पालखी सोहळा काढण्यात आली़ या सोहळ्यात आर्यवैश्य समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़
संत रंगनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त १६ डिसेंबरपासून परभणीत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे़ रविवारी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील कोमटी गल्ली भागातून पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला़ क्रांती चौक, गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, नानलपेठमार्गे ही पालखी रंगनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरापर्यंत पोहचली़ या ठिकाणी ह़भ़प़ अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे कीर्तन झाले़ सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेल्या या पालखी सोहळ्यात महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़
शोभायात्रेच्या मार्गावर ठिक ठिकाणी स्वागत करण्यात आले़ भजनी मंडळ, महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला़ तसेच अनेक बालकांनी यावेळी सजीव देखाव्याचे सादरीकरण केले़ शिवाजी चौक येथे खा़ बंडू जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले़