पान शॉपवर टाकला छापा, आढळला नशेच्या इंजेक्शनचा साठा

By राजन मगरुळकर | Published: May 4, 2023 01:32 PM2023-05-04T13:32:00+5:302023-05-04T13:32:28+5:30

या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त

Pan shop was raided, stock of drug injections was found | पान शॉपवर टाकला छापा, आढळला नशेच्या इंजेक्शनचा साठा

पान शॉपवर टाकला छापा, आढळला नशेच्या इंजेक्शनचा साठा

googlenewsNext

परभणी : शहरातील खंडोबा बाजार चौक भागातील पान शॉपवर पोलिस पथकाने बुधवारी दुपारी छापा टाकला. यामध्ये पोलिसांना टर्माइन इंजेक्शन या औषधाची अवैध विक्री करताना एकजण आढळून आला. येथून साठा, मोबाइल व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करून तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

नानलपेठ ठाण्याचे पोलिस निरीक्षक समाधान चौरे व त्यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीवरून खंडोबा बाजार चौक परिसरात एम. के. पान शॉपवर छापा टाकला. या ठिकाणी टर्माइन इंजेक्शन या औषधाची अवैध विक्री केली जात असल्याचे समजले. तेथून एक लाख पाच हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अब्दुल इमरान अब्दुल कबीर (२५, रा. संत कबीरनगर, परभणी), शेख तौसीफ शेख गफार (२०, रा.रायमाले गल्ली, खंडोबा बाजार, परभणी) हे दोघे पान शॉपमध्ये आढळले. या ठिकाणी औषधांची पडताळणी केली असता औषधी व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० मधील परिशिष्ट एचमध्ये समावेश असलेली ५९ हजार आठशे रुपयांची औषधी आढळून आली. सदर औषधेही प्रवर्ग एच प्रकारात म्हणजेच डॉक्टरांच्या चिठ्ठीवर विक्री करणारी आहेत. सदर आरोपीकडे याची चौकशी केली असता ते म्हणाले, पान शॉपचा मालक नामे अब्दुल अल्ताफ अब्दुल कबीर हा असून, सदरची औषधी कुठून आणली, कोणाकडून आणले याची माहिती अब्दुल अल्ताफ यालाच आहे, आम्ही फक्त ग्राहकांना विक्री करतो, असे सांगितले. पान शॉपचा मालक अब्दुल अल्ताफ अब्दुल कबीर हा असल्याचे समजले. 

इंजेक्शन आयपी टर्मियाच्या २०० बॉटल जप्त
जीवनावश्यक वस्तू अधिनियम प्रमाणे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने नानलपेठ येथे गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये तीन मोबाइल रोख रक्कम व मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शन आयपी टर्मियाच्या एकूण २०० बॉटल असा एकूण एक लाख ५ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक समाधान चौरे, औषध निरीक्षक मनोज पैठणे, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी पुंड, पोलिस कर्मचारी सचिन काळे, संतोष सानप, नीलेश कांबळे, दीपक केजगीर, सुधाकर शिंदे, उत्तम हनुमते, कैलास खरात यांनी केली.

Web Title: Pan shop was raided, stock of drug injections was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.