पंचनाम्याची पद्धत शेतकऱ्यांची चेष्टा करणारी; यंत्रणेला लाजा कशा वाटत नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 03:42 PM2019-11-06T15:42:37+5:302019-11-06T15:51:17+5:30
माजी खासदार राजू शेट्टी यांची यंत्रणेवर टीका
परभणी- शेतातील संपूर्ण पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सरसकट भरपाई देण्याऐवजी कागदपत्रे मागवून घेऊन शेतकऱ्यांची पंचनामे करणारी यंत्रणा चेष्टा करीत आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केला.
जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी परभणी शहरातील मोंढ्यातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हा कचेरीसमोर मोर्चा दाखल झाल्यानंतर मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करताना माज खा.राजू शेट्टी म्हणाले की, पीक विमा काढत असताना शेतकऱ्यांकडून सातबारा होल्डींग, आधार कार्ड आदी बाबतची सर्व कागदपत्रे घेण्यात आली आहेत. आता अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई व पीक विम्याची मदत देणे आवश्यक असताना पुन्हा शेतकऱ्यांना अर्ज करण्यास सांगितले जात आहे. शेतकऱ्यांना हेलपाटे करायला लावले जात आहेत. पंचनामे करणारी यंत्रणा शेतकऱ्यांची चेष्टा करीत आहे. तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.
शेतकरी खवळला तर तुमचे काही खरे नाही
विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना कदाचित हप्ते मिळत असावेत. त्यामुळेच कागदपत्रात शेतकऱ्यांना अडकवून विम्याची रक्कम न देण्याचा त्यांचा इरादा दिसतोय. पीक विमा योजना या कार्पोरेट कंपन्यासाठीच आहेत की काय? असे सद्यस्थितीत वाटत आहे. या विमा कंपन्या सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारत आहेत. शेतकऱ्यांकडूनही पैसे घेत आहेत. खोटे अहवाल तयार करुन या कंपन्यांनी गेल्या पाच-सहा वर्षात कोट्यवधी रुपये कमाविले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.डिजीटल इंडियाच्या गोष्टी तुम्ही करता मग शेतकऱ्यांना नोटकॅमचे फोटो कशाला काढायला लावता. सॅटेलाईट सर्व्हेक्षण करुन सरकगट नुकसान भरपाई झाल्याचे गृहित धरा व शेतकऱ्यांना मदत द्या, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, तो एकदा खवळला तर तुमचे काही खरे नाही, असेही ते म्हणाले.