परभणीत घरकुल उद्दिष्टपूर्तीला पंचायत समितीचा खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 07:32 PM2018-04-27T19:32:22+5:302018-04-27T19:32:22+5:30
सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०१६ पासून प्रधानमंत्री आवास योजना लागू झाली. मात्र परभणी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी उद्दीष्टपूर्तीलाच खो दिल्याने दोन वर्षांपासून अनेक लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.
परभणी : सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०१६ पासून प्रधानमंत्री आवास योजना लागू झाली. मात्र परभणी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी उद्दीष्टपूर्तीलाच खो दिल्याने दोन वर्षांपासून अनेक लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.
ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने घरकुल योजना राबविली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ पासून इंदिरा गांधी आवास योजनेचे रुपांतर प्रधानमंत्री आवास योजनेत केले आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी जिल्ह्याला उद्दिष्ट दिले जाते. प्रत्येक घरकुलासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १ लाख २० हजार रुपये, नरेगा अंतर्गत १९ हजार रुपये आणि १२ हजार रुपयांचे अनुदान स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दिले जाते. एका घरकुलासाठी तिन्ही विभागामार्फत दीड लाख रुपयांचे अनुदान चार हप्त्यात वर्गीकरण करुन दिले जाते. परभणी पंचायत समितीला दोन वर्षापासून दिलेले उद्दिष्टच पूर्ण करता आले नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हक्काच्या घरापासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०१६-१७ मध्ये परभणी पंचायत समितीला ४०५ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यातील ११७ ग्रामपंचायतीतील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सभेमधून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. निवडलेल्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले. परंतु, पंचायत समितीतील कामचुकार अधिकाऱ्यांमुळे ४०५ घरांच्या उद्दिष्टापैकी केवळ २३५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे २०१६-१७ या वर्षातील १७० घरकुले अजूनही पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षात परभणी पंचायत समिती प्रशासनाला १७३ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. अद्यापपर्यंत एकाही घराचे काम पूर्ण झालेले नाही. १७३ घरांपैकी केवळ ९८ लाभार्थ्यांना घरकाम करण्यासाठी पहिला हप्ता वर्ग झाला आहे. त्यामुळे २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षातील ३४३ घरकुले अजूनही पूर्णत्वास गेली नाहीत.
दोन वर्षांपासून परभणी पंचायत समिती अंतर्गत घरकुलाचे उद्दीष्ट पूर्ण होत नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी नव्यानेच पदभार घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात पंचायत समितीला आलेली मरगळ दूर होऊन लाभार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होते का, याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
११०० पैकी ३२ घरेच पूर्ण
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी जिल्ह्याला १ हजार ९६ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ३२ घरेच पूर्ण झाली आहेत. ६५२ लाभार्थ्याला केवळ पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे. ७५ लाभार्थ्याला दुसरा, २१ लाभार्थ्यांना तिसरा तर दोन लाभार्थ्यांंना चौथ्या हप्त्याची रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याला देण्यात आलेले १ हजार ९६ घरांचे उद्दिष्ट २०१७-१८ या आर्थिक वर्षात पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेचा फटका या योजनेला बसला आहे. त्यामुळे गरजवंत लाभार्थी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वंचित रहात आहेत.
यावर्षीच्या उद्दिष्टासाठी हालचाली
परभणी पंचायत समितीअंतर्गत ११७ गावे येतात. या गावातील लाभार्थ्याला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वत:चे घर मिळावे, यासाठी शासनाकडे उद्दिष्ट पाठविले जाते. त्यानुसार पंचायत समिती प्रशासनाकडून २०१८-१९ या वर्षातील उद्दिष्टासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.मात्र गेल्या दोन वर्षातील ३४३ घरे अजूनही अपूर्ण आहेत. त्याबाबत वरिष्ठ अधिकारी डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे खरे लाभार्थी या योजनेपासून दूर जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या योजनेतील उद्दिष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.