दीड कोटींवर पॅनलप्रमुखांचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:14 AM2020-12-25T04:14:40+5:302020-12-25T04:14:40+5:30

मानवत : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींसाठी १५ व्या वित्त आयोगांतर्गत बेसिक ग्रँडचा १ कोटी ४६ लाख ६३ हजार रुपयांचा पहिला ...

Panel chief's eye on Rs 1.5 crore | दीड कोटींवर पॅनलप्रमुखांचा डोळा

दीड कोटींवर पॅनलप्रमुखांचा डोळा

Next

मानवत : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींसाठी १५ व्या वित्त आयोगांतर्गत बेसिक ग्रँडचा १ कोटी ४६ लाख ६३ हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. निवडणुकीपूर्वी नियुक्त केलेल्या प्रशासकांनी हा निधी खर्च केला नसल्याने ४१ गावांमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायतींमधील पॅनलप्रमुखांचा या निधीवर डोळा आहे.

मानवत तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींसाठी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगातून बेसिक ग्रँडचा १ कोटी ४६ लाख ६३ हजार रुपयांचा पहिला हप्ता काही महिन्यांपूर्वी वर्ग करण्यात आला होता. त्यावेळी ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती केली होती. या प्रशासकांनी कणखर भूमिका घेवून या निधीतून विकासकामे करणे अपेक्षित असताना निष्क्रियता दाखवत त्यांनी निधीच खर्च केला नाही. परिणामी हा निधी सध्या ग्रामपंचायतींच्या खात्यावर पडून आहे. सध्या तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी किंवा बहुरंगी लढती होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या पॅनलप्रमुखांचा त्यांच्या ग्रामपंचायतींच्या खात्यावर असलेल्या निधीवर डोळा आहे. आतापर्यंत निवडून आल्यानंतर निधी मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. यासाठी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि वेळप्रसंगी मंत्रालयात खेटे मारावे लागत होते. आता आपसूकच खात्यावर निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे निवडून आल्यानंतर विकासकामे करण्याची संधी त्यांना उपलब्ध झाली आहे. आता निवडून दिलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड होणार आहे. त्यामुळे विविध गावांतील पॅनलप्रमुख आपला सरपंच व्हावा, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

३३ टक्के निधीची केली कपात

शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध योजनांमधील ३३ टक्के निधीची कपात केली होती. असे असताना मानवत तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र तब्बल १ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गावपुढारी आनंदात आहेत. हाती पैसा असूनही प्रशासकांनी तो खर्च केला नाही. त्यामुळे या नेतेमंडळींना वेगळाच आनंद आहे. आपण सत्तेत आल्यानंतर हा निधी खर्च करू व ग्रामस्थांना आपले काम दाखवू असा निश्चय करून हे पॅनलप्रमुख कामाला लागले आहेत.

Web Title: Panel chief's eye on Rs 1.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.