'मी जिंवत आहे!'; कृषी अधिकाऱ्याने कामावर कार्यरत ६ मजुरांना दाखविले मयत
By मारोती जुंबडे | Published: September 19, 2023 05:03 PM2023-09-19T17:03:46+5:302023-09-19T17:04:47+5:30
मजुरांच्या आंदोलनानंतर कामावर रुजू होण्याचे दिले आदेश
परभणी : जिल्ह्यातील कृषी विभागांतर्गत गंगाखेड, चिखलठाणा, जिंतूर आणि परभणी या चार कृषी बीज गुणन केंद्रात कार्यरत सहा शेतमजुरांची कार्यालयीन अभिलेखात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षकांनी केलेला हा प्रकार मजुरांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी सोमवारी विविध ठिकाणच्या मजुरांसोबत जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.
गंगाखेड तालुका कृषी बीज केंद्रात शंकर थावरू राठोड, गंगूबाई राम जाधव, शिवाजी थावरू राठोड, जळबा रंगनाथ भालेराव हे सर्व जण, चिकलठाण्यात (ता. सेलू) हरिभाऊ नाथोबा वाघ तर परभणी फळ रोपवाटिकामध्ये कार्यरत हलीमाबी जैनुद्दीन या मजुरांना मयत दाखविण्यात आले. शेतमजुरास वर्षात २४० दिवस काम केले असता, त्यांना शासकीय सेवेत समावून घेण्याचा २०१९ मधील निर्णय आहे. या कामगारांसंदर्भातील पूर्वीच्या कायद्यानुसार त्यांना कृषी विभागाने कायम करणे आवश्यक आहे. असे असतानाही जिल्ह्यातील काही शेतमजूर या लाभापासून वंचित आहेत. त्यांना कायम करण्याऐवजी त्यातीलच काही मजुरांना विविध कारणे दाखवून अपात्र करत कामावरून कमी केले. तेवढेच नव्हे, तर सहा मजुरांना मयत म्हणून दाखविले. हा प्रकार मजुरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हा कृषी कार्यालयात आंदोलन केले. त्यानंतर आमदार राहुल पाटील यांनी आंदोलनस्थळी मजुरांची भेट घेऊन प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हरणे यांची भेट घेऊन जाब विचारला. यावर त्यांनी तातडीने चूक दुरुस्त करून मजुरांना कामावर रुजू होण्याचे पत्र दिले.
कामावर रुजू करण्याचे दिले पत्र
शिवाजी राठोड, शंकर राठोड तालुका बीज केंद्र गंगाखेड यांना उद्यापासून वयाच्या दाखल्याप्रमाणे गंगाखेडमध्ये कामावर घेण्यात येईल. त्याचबरोबर थकबाकी व नियमाप्रमाणे त्यांना महागाई भत्ता अनुदान मागणी करून त्यांना नियमाप्रमाणे कोर्ट आदेशाप्रमाणे मजुरी वेतन अदा करण्यात येईल, न्याय निर्णयाच्या अनुषंगाने सुधारित प्रस्ताव आयुक्तालय कार्यालयास सादर करणार असल्याचे पत्र उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे यांनी संबंधित आंदोलकांना दिले.
न्यायालयीन लढा लढणार
चूक झालेली कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली असता, त्यांनी त्या मजुरांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश दिले; परंतु जाणीवपूर्वक अशा प्रकारचा खोडसाळपणा करणाऱ्या तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयीन लढा लढणार आहोत.
- बळवंत मोरे, शेतकरी शेतमजूर पंचायत, राज्य उपाध्यक्ष
कृषी खात्याचे पाप
जिवंत माणसाला मृत घोषित करण्याचे पाप या कृषी खात्याने केले आहे. दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, मजुरांना महागाई भत्ता देण्यात यावा, २४० दिवस काम करणाऱ्या मजुरांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे.
- डॉ. राहुल पाटील, आमदार
नजर चुकीने झाले
पंधरा दिवसांपुर्वी कृषी आयुक्तालयात मयत, अपात्र मजुरांचा प्रस्ताव पाठवला होता. यात नजर चुकीने काही मजुरांना मयत दाखविण्यात आले होते. परंतु, चुक लक्ष्यात आल्यावर आम्ही सुधारित प्रस्ताव तातडीने वरिष्ठांना पाठविला आहे.
- आर.बी. हरणे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी