Parabhani: परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्यास कॅबिनेटची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 07:43 PM2022-03-02T19:43:35+5:302022-03-02T19:49:56+5:30
परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
परभणी: गेल्या वर्षी मराठवाडा मुक्तीदिनी औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली होती. त्यानंतर आता आज या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली.
काय म्हणाले अशोक चव्हाण?
अशोक चव्हाण यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. ते म्हणाले, 'मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयानुसार परभणी येथे पुढील 4 वर्षात 682 कोटी रुपये खर्च करुन 100 प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय व 403 खाटांचे संलग्नित रुग्णालय उभारले जाईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण तर नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होईल.'
मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयानुसार परभणी येथे पुढील ४ वर्षात ६८२ कोटी रूपये खर्च करून १०० प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय व ४०३ खाटांचे संलग्नित रुग्णालय उभारले जाईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण तर नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होईल.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) March 2, 2022
सरकारचे मानले आभार
'महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय उभारण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे परभणीकरांची जुनी मागणी पूर्ण झाली असून, काँग्रेसचा परभणी जिल्ह्याचा संपर्क मंत्री या नात्याने मी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व मंत्रिमंडळाचा आभारी आहे.'
परभणीकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी देण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या चार वर्षांपासून सर्वपक्षीय नेत्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत होते. विशेषत: गेल्या तीन वर्षांपासून परभणीचे शिवसेना खासदार बंडू जाधव यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी औरंगाबाद येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता आज या निर्णयाला मंजुरी देण्यात आल्यामुळे परभणीकरांनी पाहिलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न आता साकार होणार आहे.