'समृद्धी'च्या मावेजासाठी शेतकरी आक्रमक; बैलगाडी आडवी लावून केले रस्तारोको आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 11:58 IST2025-04-21T11:58:17+5:302025-04-21T11:58:45+5:30
सेलू ते देवगावफाटा रस्त्यावर चिकलठाणा पाटीवर अडवला रस्ता

'समृद्धी'च्या मावेजासाठी शेतकरी आक्रमक; बैलगाडी आडवी लावून केले रस्तारोको आंदोलन
- रेवणअप्पा साळेगावकर
सेलू (परभणी) : जालना ते नांदेड समृद्धी महामार्गासाठी जिल्हास्तरीय समितीच्या निर्णयानुसार भूसंपादन मावेजा मिळत नाही या कारणासाठी सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज सोमवारी सकाळी १०. १५ वाजेता आक्रमक पवित्रा घेतला. सेलू ते देवगाव फाटा येथील चिकलठाणा पाटीवर बैलगाडी आडवी लावून रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
समृद्धी महामार्गावर भूसंपादीत जमीन मावेजाच्या ९ जून २०२३ च्या अहवालास शेतकऱ्यांनी विरोध केला होता. त्यानंतर ४ ऑक्टोबर २०२४ जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे जिल्हास्तरीय समीतीने हंगामी बागायती क्षेत्र ग्राह्य धरून मंजूर केलेला मावेजास शेतकऱ्यांनी संमती दिली. पण हा मावेजा शेतकऱ्यांना अद्यापही मिळाला नाही. या उलट जिल्हा प्रशासनाने १० जानेवारी २०२५ ला पत्र देऊन शेतकऱ्यांचा आक्षेप असलेल्या ९ जून २०२३ च्या अहवालानुसारच मावेजा देण्याचा प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश दिले. याला शेतकऱ्यांनी परत ९ जुन २०२३ च्या अहवालास विरोध करीत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचीका दाखल केली आहे. जिल्हास्तरीय समितीने यापूर्वी हंगामी बागायती क्षेत्र मंजूर केल्याप्रमाणे मावेजा तातडीने द्यावा, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी आज सकाळी सेलू ते देवगाव फाटा येथे रस्तारोको आंदोलनास सुरुवात केली. आंदोलनाने या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प पडली आहे.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी संगीता सानप, उपविभागीय पोलीस अधिकारी, दिपक टिप्परसे, तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, पो.नी दिपक बोरसे आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. आंदोलकांनी लेखी स्वरूपात हमी मिळाल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात घेईल अशी भूमिका घेतली आहे.