वेतनासाठी भर उन्हात मनपा कर्मचाऱ्यांचे कामबंद; जोरदार घोषणाबाजीत प्रशासनाचा निषेध
By राजन मगरुळकर | Published: April 5, 2023 03:23 PM2023-04-05T15:23:54+5:302023-04-05T15:24:13+5:30
कर्मचाऱ्यांना व संघटनेला मंडप टाकण्यासाठीची परवानगी नाकारण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांना भर उन्हात बसावे लागले.
परभणी : महापालिकेतील कर्मचाऱ्यांना थकीत असलेल्या तीन महिन्याचे वेतन तत्काळ अदा करावे, या मागणीसाठी परभणी महापालिका अधिकारी, कर्मचारी महासंघाच्या वतीने बुधवारपासून कामबंद आंदोलनास सुरुवात करण्यात आली. मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर कर्मचाऱ्यांना संपासाठी मंडप टाकण्यास परवानगी नाकारल्यामुळे कर्मचाऱ्यांनी भर उन्हात ठिय्या मांडून घोषणाबाजी केली.
मनपा कर्मचाऱ्यांचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्याचे वेतन थकले आहे. या महिन्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच रमजान ईद असल्याने कर्मचाऱ्यांना थकीत वेतन देण्यात यावे व फेस्टिवल ऍडव्हान्स द्यावा, यासह अन्य दहा मागण्यांसाठी यापूर्वी मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्याकडे कर्मचारी महासंघाने निवेदन दिले होते. मात्र, चार एप्रिलपर्यंत वेतन अदा करण्यात न आल्याने कर्मचारी महासंघाच्या वतीने बुधवारपासून या कामबंद आंदोलनास सुरुवात करण्यात आली.
मंडप टाकण्यासाठीची परवानगी नाकारली
बुधवारी सकाळी मनपा कार्यालय परिसरात अकरा ते साडेअकरा दरम्यान कर्मचारी दाखल झाले. त्यांनी घोषणाबाजी केली. सदरिल ठिकाणी कर्मचाऱ्यांना व संघटनेला मंडप टाकण्यासाठीची परवानगी नाकारण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांना भर उन्हात बसावे लागले. कर्मचाऱ्यांनी या धोरणाचा निषेध नोंदविला. आंदोलनात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नजम खान, उपाध्यक्ष श्याम रेंगे, सरचिटणीस विकास रत्नपारखे, के.के.आंधळे, अनुसयाबाई जोगदंड, अभिजीत कुलकर्णी यांच्यासह जवळपास सातशे कर्मचारी सहभागी झाले आहेत.