Parabhani: आर्थिक देवाणघेवाणीतून पाथरीत खून; एकूण पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 16:21 IST2025-04-18T16:21:25+5:302025-04-18T16:21:33+5:30
खून प्रकरणातील तीन आरोपींना परभणी, पाथरी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले.

Parabhani: आर्थिक देवाणघेवाणीतून पाथरीत खून; एकूण पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पाथरी (जि. परभणी) : पाथरी ठाण्यात दाखल अनंता टोम्पे खून प्रकरणातील तीन आरोपींना परभणी, पाथरी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले. तसेच यात अन्य दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. एकूण पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.
यामध्ये रुपाली टोम्पे यांच्या खबरीवरून पाथरी ठाण्यात भारत वाव्हळे, राहुल शिंदे आणि अशोक खंडागळे या तिघांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपासासाठी पाथरी ठाणे, स्थानिक गुन्हा शाखेचे पथक तयार केले. तपासादरम्यान पोलिस पथकास आरोपी पुण्यात असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने पुणे वाघोली परिसरातील पेट्रोल पंपावरून राहुल नामदेव शिंदे आणि अशोक श्रीपती खंडागळे या दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. आरोपींनी चौकशी दरम्यान आर्थिक देवाणघेवाणीतून अनंता याला मारहाण केल्याचे सांगितले. आरोपींनी गुन्ह्यात त्यांच्यासोबत अनिल बालासाहेब उफाडे हा सहभागी असल्याची माहिती दिली. या माहितीवरून सुसगाव येथून अनिल उफाडेला ताब्यात घेतले. पाथरी पोलिसांनी संजय आश्रोबा शिंदे आणि कपिल दगडोबा गवारे यास चौकशीसाठी ताब्यात घेतले.
ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर. एस. मुत्येपोड, सहायक पोलिस उपनिरीक्षक मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबळ, फारुखी, गणेश कौटकर, पाथरी ठाण्याचे निरीक्षक महेश लांडगे, स्वामी, घाईवट, कापूरे, सांगळे, लटपटे, शितळे, मुजमुले, घुगे, सायबरचे संतोष वावळ, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर यांच्या पथकाने केली.