Parabhani: चालकाचे नियंत्रण सुटले अन् साड्यांनी भरलेला ट्रक थेट गोदावरी पात्रात कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 11:37 IST2025-03-06T11:36:46+5:302025-03-06T11:37:00+5:30
गंगाखेड परभणी मार्गावरील घटना; ट्रक चालक आणि अन्य एकजण जखमी

Parabhani: चालकाचे नियंत्रण सुटले अन् साड्यांनी भरलेला ट्रक थेट गोदावरी पात्रात कोसळला
गंगाखेड/खळी: चालकाचे नियंत्रण सुटल्याने साड्यांनी भरलेला ट्रक थेट गोदावरी नदीपात्रात कोसळल्याची घटना परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर खळी-दुसलगाव परिसरात आज सकाळी ९ वाजता घडली. यात ट्रकमधील चालक आणि अन्य एक असे दोघे जखमी झाल्याची माहिती आहे. नागरिकांनी धाव घेऊन त्यांना नदीतून बाहेर काढले असून दोघांवरही उपचार सुरू आहेत.
धुळे येथून उदगीरकडे ट्रान्सपोर्ट वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अचानक गोदावरी नदीत आयशर पलटला. साड्यांची वाहतूक करणारा हा आयशर असल्याचे कळते. घटनेची माहिती कळताच खळी येथील युवा कार्यकर्ते उत्तम पवार, रुग्णवाहिका चालक रावण भालेराव, दत्ता सोळंके यांनी गोदावरी नदीमध्ये उतरून ट्रकमधील दोघांना बाहेर काढले. जखमी झालेल्या दोघांनाही तात्काळ गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने साड्यांनी भरलेला ट्रक थेट गोदावरी नदीपात्रात कोसळला, दोघे जखमी; गंगाखेड ते परभणी मार्गावरील घटना #parabhani#marathwada#accident#godawaririverpic.twitter.com/iKCxgxY8bU
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) March 6, 2025
शोएब खान गफार खान व जुबेर मनियार (दोघेही रा.धुळे) असे दोघां जखमींचे नाव आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे यांचेसह अधिकारी- पोलिसांनी धाव घेतली. उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.हेमंत मुंडे यांच्या देखरेखी खाली जखमींवर उपचार सुरू आहेत.