बेकायदेशीररित्या संस्था ताब्यात घेऊन फसवणूक प्रकरणात एका विरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 02:33 PM2020-02-13T14:33:32+5:302020-02-13T14:38:21+5:30
जिल्हा रुग्णालय परिसरातील मॉडेल इंग्लिश सोसायटीवर जिल्हाधिकारी हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत
परभणी : अधिकार नसतानाही बेकायदेशीररित्या संस्था ताब्यात घेऊन संस्थेची अभिलेखे स्वत:जवळ बाळगली तसेच अनाधिकृतरित्या आर्थिक व्यवहार करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी निखील जैन यांच्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.
येथील जिल्हा रुग्णालय परिसरातील मॉडेल इंग्लिश सोसायटीवर जिल्हाधिकारी हे पदसिद्ध अध्यक्ष असून, माध्यमिक शिक्षणाधिकारी या प्रशासकीय अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी या संस्थेची विशेष सभा घेण्याचे आदेश प्रशासकीय अधिकारी यांना दिले होते. त्यावरुन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन शिक्षण विभागातील अधीक्षक संतोष कठाळे यांनी ६ फेब्रुवारी रोजी मॉडेल इंग्लिश एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात विशेष सभा घेतली. त्यावेळी अनियमियततेचे हे प्रकार समोर आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन अधीक्षक संतोष गोपीनाथ कठाळे यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार या सोसायटीचे सचिव हेमराज जैन यांच्या निधनानंतर अधिकार नसतानाही संस्थेच्या नावावर महाराष्ट्र बँकेच्या खात्यातून आर्थिक व्यवहार सुरु ठेवले. तसेच ठराव बूक, आर्थिक अभिलेखे, कार्यकारी मंडळ सूचना रजिस्टर, सर्वसाधारण सभा सूचना रजिस्टर, सभासद नोंदवही, लेखा परीक्षण अहवाल, संस्थेचे मूळ नोंदणीपत्र, संस्थेची घटना, स्थावर व जंगम मालमत्ता रजिस्टर, बँकेचे पासबूक, चेकबूक, कर्मचाऱ्यांची नोंदवही, बिंदूनामावली नोंदवही, फेरफार रजिस्टर, शाळा मान्यतेचे आदेश आदी अभिलेखे स्वत:जवळ बाळगून शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन नानलपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
ठरावाची पाने फाडली
संतोष कठाळे यांनी तक्रारीत म्हटले आहे की,६ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या विशेष सभेत ठराव बुकातील काही पाने फाडलेली आढळली. त्याचप्रमाणे अभिलेखेही उपलब्ध नसल्याचे आढळले. त्यावरुन जिल्हाधिकाऱ्यांनी कारणेदाखवा नोटीस बजावून ही अखिलेखे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल करण्याचे सूचित केले होते. मात्र तेही दाखल केले नाहीत. तसेच अनाधिकृत कार्यकारी मंडळ स्थापन करुन स्वत: सचिव असल्याचे भासवून शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.