परभणीचा पारा १०.३ अंशावर; वातावरणात गारवा, थंडीमध्ये दररोज वाढ
By राजन मगरुळकर | Published: December 20, 2023 03:59 PM2023-12-20T15:59:31+5:302023-12-20T16:00:24+5:30
यावर्षीचे परभणी जिल्ह्यातील हे सर्वात कमी तापमान असल्याची नोेंद झाली आहे.
परभणी : मागील पाच-सहा दिवसांमध्ये किमान तापमान १५ अंशाच्या आतच आले आहे. हुडहुडी भरेल, असा वातावरणात गारवा निर्माण झाल्याने थंडीमध्ये दररोज वाढ होत आहे. शहर परिसरात बुधवारी किमान तापमान १०.३ अंश सेल्सियस नोंद झाले होते. यावर्षीचे जिल्ह्यातील हे सर्वात कमी तापमान असल्याची नोेंद झाली आहे.
जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून बदलत्या वातावरणाने सर्दी, ताप, खोकला, अंगदूखी यासह विविध आजारांनी डोकेवर काढले आहे. पहाटे, सकाळी आणि रात्रीच्या वेळी थंडीची लाट निर्माण झाली आहे. शनिवारी जिल्ह्याचा पारा हा ११ अंश, रविवारी १३.९ अंश तर सोमवारी पारा १४.९ अंशावर होता. मंगळवारी तसेच बुधवारी या तापमानात पून्हा घट झाली आहे. त्यामुळे परभणीकरांना हिवाळ्यात तापमानातील चढ-उतार अनुभवायला मिळत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात फारशी थंडी नव्हती. पहाटेच्या वातावरणात गारठा निर्माण होत आहे. दरम्यान, यावर्षीचे सर्वात कमी तापमान बुधवारी १०.३ अंश नोंद झाले असल्याची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्राने घेतली आहे. तर आयएमडीच्या नोंदीनूसार हेच तापमान १२.७ एवढे नोंद झाले होते. मागील वर्षी याच दिवशी २० डिसेंबरला ९.४ अंश सेल्सियस तापमान होते.
जिल्ह्यातील ९ दिवसातील तापमान
१० डिसेंबर १३.४ अंश
११ डिसेंबर १४.१ अंश
१२ डिसेंबर १३ अंश
१३ डिसेंबर १४.५ अंश
१४ डिसेंबर १३ अंश
१५ डिसेंबर १२.६ अंश
१६ डिसेंबर ११ अंश
१७ डिसेंबर १३.९ अंश
१८ डिसेंबर १४.९ अंश
१९ डिसेंबर १२.९ अंश
पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या प्राप्त अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील तीन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात पुढील तीन दिवस फारशी तफावत जाणवणार नाही. तर २२, २३ डिसेंबरला किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने दिली.