परभणी : ३ आरोपींविरुद्ध मोक्काअंतर्गत दोषारोपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:49 AM2019-11-26T00:49:40+5:302019-11-26T00:50:00+5:30
शहरातील शांतीवन कॉलनीत झालेल्या दरोडा प्रकरणातील तीन आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर मुंबई येथील अप्पर पोलीस महासंचालकांच्या परवानगीने या आरोपींविरुद्ध औरंगाबाद येथील विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल दाखल करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील शांतीवन कॉलनीत झालेल्या दरोडा प्रकरणातील तीन आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर मुंबई येथील अप्पर पोलीस महासंचालकांच्या परवानगीने या आरोपींविरुद्ध औरंगाबाद येथील विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल दाखल करण्यात आले आहे.
शहरातील दत्तधाम परिसरातील शांतीवन कॉलनीत ३० मे २०१९ रोजी ऋषिकेश वासुदेव चक्रावार यांच्या घरावर दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना मारहाण करुन १५ तोळे सोन्याचे दागिने (५ लाख रुपये) आणि चांदीचे दागिने व नगदी पाच हजार रुपये असा ५ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी या प्रकरणात टोळी प्रमुख चेतन उर्फ मर्दा गिरीश उर्फ दगडू भोसले (रा.बोराडी गायरान, ता.गंगापूर), सदस्य नितीन सोमनाथ शिंदे (रा.मकोडी ता.सेनगाव), सतीश बिस्कीट्या पवार (रा.काशीनाथ लॉजच्या बाजूला, जळगाव) या तिघांना अटक केली. या चोरट्यांची यापूर्वीची गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची शिफारस पोलीस अधिक्षकांकडे केली होती. हा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सादर केल्यानंतर त्यांनी त्यास मंजुरी दिली. त्यानुसार या गुन्ह्यात संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ ची वाढ करुन पूर्णा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तपास सुपूर्द करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, आरोपी नितीन सोमनाथ शिंदे, सतीश बिस्कीट्या पवार आणि चेतन उर्फ मर्दा उर्फ दगडू भोसले या तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचे कलम २३ (२) प्रमाणे औरंगाबाद येथील विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास राज्याचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांनी परवानगी दिली असून, उपविभागीय पोलीस अधिकारी एस.व्ही. कर्डीले यांनी २२ नोव्हेंबर रोजी हे दोषारोपपत्र दाखल केले आहे.
पाच टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई
४परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आतापर्यंत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पाच टोळ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
४पूर्णा, पाथरी, चारठाणा, कोतवाली आणि नवा मोंढा पोलीस ठाण्यांतर्गत मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यांपैकी ३ गुन्ह्यांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले असून, एकूण १० आरोपी अटक झाल्यापासून कारागृहात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.