परभणी : १७४ शिक्षकांना दिले नियुक्तीपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:40 AM2019-09-14T00:40:46+5:302019-09-14T00:41:07+5:30
राज्य शासनाच्या पवित्र पोर्टल प्रणालीअंतर्गत प्राप्त झालेल्या यादीतील १७४ प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या वतीने नियुक्तीपत्र देण्यात आले असून १५ प्राथमिक शिक्षकांना पदवीधर पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्य शासनाच्या पवित्र पोर्टल प्रणालीअंतर्गत प्राप्त झालेल्या यादीतील १७४ प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या वतीने नियुक्तीपत्र देण्यात आले असून १५ प्राथमिक शिक्षकांना पदवीधर पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टल प्रणालीअंतर्गत जिल्हा परिषदेकडे मराठी माध्यमाच्या २०६ आणि उर्दू माध्यमाच्या ५ शिक्षकांची यादी प्राप्त झाली होती. जि.प.कडे मराठी माध्यमाची २०१ आणि उर्दू माध्यमाची ५ पदे रिक्त आहेत. प्राप्त झालेल्या यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली. त्यामध्ये ३१ उमेदवारांचे अर्ज अपात्र किंवा प्रलंबित ठेवण्यात आले. या उमेदवारांचे ११ व १२ सप्टेंबर रोजी समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर मराठी माध्यमाच्या १६९ आणि उर्दू माध्यमाच्या ५ शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्यात आले. तसेच १५ प्राथमिक शिक्षकांना पदवीधरची पदोन्नती देण्यात आली. जिल्हा परिषदेत जि.प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते, सीईओ बी.पी.पृृथ्वीराज, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, माध्यमिक शिक्षणाधिकारी वंदना वाहुळ, उपशिक्षणाधिकारी संजय ससाणे यांच्या उपस्थितीत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यामुळे १८९ रिक्त जागांचा अनुशेष भरला गेला आहे. उर्वरित २२ जागा रिक्त राहिल्या आहेत.
दरम्यान, या संदर्भात बोलताना जि.प.शिक्षण सभापती भावनाताई नखाते म्हणाल्या की, जिल्हा परिषदेत ९०० शिक्षक, मुख्याध्यापकांचा रिक्त पदांचा अनुशेष होता. शिक्षणमंत्र्यांकडे या संदर्भात पाठपुरावा केला. त्यानंतर आतापर्यंत ८३९ शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. उर्वरित ४०० शिक्षकांच्या पदांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.