परभणी : १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह; ८ ची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:15 PM2020-03-18T23:15:43+5:302020-03-18T23:16:10+5:30
परदेशातून व परराज्यातून जिल्ह्यात आलेल्या ३६ जणांची आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करण्यात आली असून, त्यातील १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ ८ जणांचे अहवाल येणे बाकी असून, बुधवारी ७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परदेशातून व परराज्यातून जिल्ह्यात आलेल्या ३६ जणांची आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करण्यात आली असून, त्यातील १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ ८ जणांचे अहवाल येणे बाकी असून, बुधवारी ७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत़
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे़ सर्वत्र जनजागृती केली जात आहे़ जिल्ह्यात १८ मार्चपर्यंत ग्रामीण भागातील ७ प्रवासी परदेशातून तर शहरी भागातील २० प्रवासी परदेशातून आले आहेत़ या शिवाय ८ प्रवासी परराज्यात प्रवास करून जिल्ह्यात आले आहेत़ त्यामध्ये परभणी तालुक्यातील १, गंगाखेड तालुक्यातील ५, मानवत तालुक्यातील ३, पाथरीतील ५, सेलूतील ८, जिंतूरमधील १ व परभणी शहरातील १० आणि इतर ठिकाणाहून आलेल्या एक अशा एकूण ३६ प्रवाशांची तपासणी आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे़ हे सर्व नागरिक आरोग्य विभागाच्या निगराणीखाली असून, ९ जणांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात तर २६ जणांना होम कोरेंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे़ त्यांची फेर तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे़ २६ जणांची प्रकृती स्थिर आहे़ आतापर्यंत एकूण २४ जणांचे स्वॅब आरोग्य विभागाच्या वतीने घेवून ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते़ ४ जणांचे स्वॅब रिजेक्ट करण्यात आले असून, १२ जणांचा निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे़ ८ स्वॅबचा अहवाल अद्याप आलेला नाही़
बुधवारी गंगाखेडमधील २, पाथरीतील १, सेलूतील २ व परभणीतील २ अशा एकूण ७ नवीन नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत़
दरम्यान, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी शहरातील डॉ़ प्रफुल्ल पाटील मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्थापन करण्यात आलेल्या खाजगी कक्षास भेट देऊन पाहणी केली़
तसेच जिल्हा चिकित्सक कार्यालयातर्फे मास्क, सॅनिटायझर, हँडवॉशचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध करून ठेवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत़
१८ मार्च रोजी सायंकाळी ६ पर्यंत जिल्ह्यातही एकही कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळलेला नाही़
त्यामुळे जनतेने कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे़
गंगाखेडमध्ये ३ तर पाथरी १ कोरोना संशयित
४गंगाखेड/ पाथरी : गंगाखेड तालुक्यात मंगळवारी कोरोनाचे तीन संशयित नागरिक आढळले असून, त्यातील एका नागरिकास परभणी येथील जिल्हा रुग्णालयात तर दोघांना गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णलायातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे़ हे नागरिक सौदी अरेबिया, पुणे व परराज्यातून आलेले होते तर पाथरी शहरातील एका संशयितास १७ मार्च रोजी परभणीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़
४कोरोनाचा शिरकाव राज्यात झाल्यानंतर राज्यभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे़ परभणी जिल्ह्यातही ठिक ठिकाणी नागरिकांची तपासणी केली जात आहे़ विशेषत: विदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे़ सौदी अरेबिया येथे कामासाठी असलेल्या भारतीय नागरिकांना परत पाठविण्यात आल्याने गंगाखेड शहरातील एक रहिवासी १५ मार्च रोजी शहरात दाखल झाला़ मात्र त्यांना सर्दी, खोकला, तापाचा त्रास होत असल्याने सकाळी ११ वाजेच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ त्यांच्यावर या रुग्णालयातील विलगीकरण कक्षात तपासणी करून परभणी येथे हलविण्यात आले आहे़
४तसेच हैदराबाद जवळील लिंगम पल्ली येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासही गळ्याच्या खवखवीचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले़ तसेच खोकलेवाडी येथील एका व्यक्तीसही त्रास होत असल्याने गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ या दोन्ही रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ वैद्यकीय अधीक्षक डॉ़ हेमंत मुंडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ़ रेशमा गौस, डॉ़ केशव मुंडे यांच्या निगराणीखाली दोन्ही नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवले असून, त्यांचे स्वॅब नमुने चाचणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविले आहेत़
४पाथरी शहरातील एका नागरिकाला सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्याने त्यास बुधवारी परभणी येथील जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे़ हा नागरिक दोन दिवसांपूर्वीच पुणे येथून परताला होता हे विशेष़
मुंबई, पुण्यातून आलेल्या नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
४परभणी : कोरोना या विषाणू संसर्गाचा शिरकाव झाला असून, शेजारी जिल्ह्यातही काही संशयित रुग्ण आढळले आहेत़ या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे आदी महानगरातून जिल्ह्यात येणाºया नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी पुढील १४ दिवस शक्य तो घरातच थांबावे, गर्दीमध्ये जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे़
४कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासन उपाययोजना करीत आहे़ मागील चार दिवसांपासून मुंबई, पुणे या महानगरातून जिल्ह्यात नागरिकांचे स्थलांतर होत आहे़ तेव्हा महानगरातून आलेल्या नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी़
४श्वसनाच्या विकाराचे लक्षणे जाणवत असल्यास जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी केले आहे़
एरंडेश्वर, सोनपेठ आरोग्य केेंद्रात कोरेंटाईन कक्षाची स्थापना
परभणी : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत एरंडेश्वर व सोनपेठ येथील प्राथमिक आरोग्य कक्षात कोरेंटाईन कक्ष स्थापन करण्यात आला असून, या कक्षाची बुधवारी जि़प़च्या आरोग्य सभापती अंजलीताई गंगाप्रसाद आणेराव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ शंकरराव देशमुख आदींनी पाहणी केली़ पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे जिल्हा परिषदेच्या वतीने नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात आली आहे़ या इमारतीत कोरेंटार्इंन कक्षाची स्थापना करण्यात आली असून, २० बेड स्थापन करण्यात आले आहेत़ या कक्षाची जि़प़च्या आरोग्य सभापती अंजलीताई आणेराव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ शंकरराव देशमुख, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, तालुका वैद्यकीय अधिकारी संदीप काळे आदींनी बुधवारी पाहणी केली़ यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ़ दिलीप रणवीर यांनी या संदर्भात माहिती दिली़ यावेळी एस़एस़ गिणगिणे, विभागप्रमुख एस़पी़ मकासे, आरोग्य सेविका आदींची उपस्थिती होती़ येथे २४ तास आरोग्य कर्मचारी कार्यरत राहणार असल्याचे सांगण्यात आले़ जिल्हा परिषदेच्या वतीने सोनपेठ येथेही कोरेंटाईन कक्ष स्थापन करण्यात आला आहे़ जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही़ प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली आहे़ त्यामुळे जनतेने घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य सभापती अंजलीताई गंगाप्रसाद आणेराव यांनी केले आहे़