परभणी : तब्बल दहा लाख झाडे वाळली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 01:10 AM2018-12-24T01:10:30+5:302018-12-24T01:12:06+5:30
यावर्षीच्या जून महिन्यात प्रशासनाने राबविलेल्या वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत लावलेल्या ३५ लाख ३५ हजार झाडांपैकी तब्बल १० लाख झाडे जळून गेली आहेत. वृक्षारोपण केल्यानंतर या झाडांना पाणी मिळाले नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : यावर्षीच्या जून महिन्यात प्रशासनाने राबविलेल्या वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत लावलेल्या ३५ लाख ३५ हजार झाडांपैकी तब्बल १० लाख झाडे जळून गेली आहेत. वृक्षारोपण केल्यानंतर या झाडांना पाणी मिळाले नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वृक्षारोपण मोहीम राबविली जाते. यावर्षी १ ते ३१ जुलै या काळात जिल्हाभरात ही मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे, वृक्षारोपण करण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांना उद्दिष्टही निश्चित करुन दिले जाते. वेगवेगळ्या विभागांनी शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात वृक्षारोपणास सुरुवात केली. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी तसेच मोकळ्या जागा, खेळाची मैदाने, उद्याने, शासकीय कार्यालयांचा परिसर, गायरान जमिनी, वनक्षेत्र अशा ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने यावर्षी लावलेल्या झाडांची वाढ होईल, अशी अपेक्षा होती; परंतु, पावसाने ताण दिला. मोसमी पाऊसही वेळेवर बसरला नाही आणि परतीचा पाऊस फिरकलाच नाही. त्यामुळे लावलेली झाडे कोमेजू लागली. कोवळ्या रोपट्यांचे रोपण करण्यात आले; परंतु, जमिनीतील पाणीपातळी दिवसेंदिवस खालावल्याने एक-एक करीत ही झाडे जळू लागली.
जिल्ह्यामध्ये ३५ लाख ३५ हजार झाडे लावण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाला ३४ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी वनविभागाने ७ लाख झाडे लावली. ग्रामपंचायतींनी १२ लाख वृक्षारोपण केले. तर प्रशासनाच्या इतर २२ विभागाने सुमारे १६ लाख झाडे लावली आहेत; परंतु, निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी देखील झाडे जळू लागली आहेत.
काही झाडांचे अस्तित्वही नाहीसे झाले आहे. त्यामुळे वृक्षारोपण मोहीम राबवूनही यावर्षी मोहिमेचा फारसा परिणाम होणार नसल्याचे दिसत आहे.
दुष्काळाबरोबरच : दुर्लक्षही भोवले
४परभणी जिल्ह्यामध्ये दरवर्षी वृक्षारोपण मोहीम थाटात राबविली जाते. झाडे लावताना अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचाही मोठा उत्साह असतो. प्रत्येक ठिकाणी झाड लावल्यानंतर छायाचित्र काढून घेतले जातात. मात्र हा उत्साह तेवढ्या दिवसापुरता टिकतो. त्यानंतर लावलेल्या झाडांकडे साधे लक्षही दिले जात नाही. काही शाळा, शासकीय कार्यालयांचा अपवाद वगळता बहुतांश झाडे संवर्धनाअभावीच जळून जातात, हा यापूर्वीचाच अनुभव यावर्षीही दिसून आला. विशेष म्हणजे, त्यात भर पडली ती दुष्काळाची. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. भूजलपातळीही मोठ्या प्रमाणात घटली असून त्याचा फटका वृक्षारोपण मोहिमेला बसला आहे.
वनविभागाची ८२ टक्के झाडे जगली
वनविभागाने यावर्षी ७ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जिंतूर तालुक्यातील वनक्षेत्र भागात ही झाडे लावली असून या झाडांपैकी सुमारे ८२ टक्के झाडे आजही तग धरुन आहेत, असाही दावा या विभागाच्या अधिकाऱ्यांनी लावला आहे. लावलेली झाडे जगविण्यासाठी कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली असून हे कर्मचारी झाडांना नियमित पाणी देतात. परिणामी, ही झाडे जगली असल्याची माहिती उपविभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी सांगितले.
पाणी देण्याचे नियोजन
४जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नवीन रोपे जळत आहेत. या रोपांना वाचविण्यासाठी आम्ही प्रत्येक रोपाला मल्चिंग करणार आहोत. तसेच पाण्याची उपलब्धता कमी असल्याने प्लास्टिकच्या बाटल्या झाडांना बांधून त्याद्वारे पाणी देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त झाडे जगावीत, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपविभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी सांगितले.
परिसर झाला ओसाड
४परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते कुंभारी बाजार आणि उमरी फाटा ते उमरी या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात झाडे लावली होती. दोन महिन्यांपासून पाऊस झाला नसल्याने या दोन्ही मार्गावरील झाडे वाळून गेली आहेत. या ठिकाणी आता झाडांसाठी तयार केलेले खड्डे तेवढे शिल्लक आहेत.