परभणी : स्मार्ट गावांसाठी ११ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:09 AM2018-04-04T00:09:35+5:302018-04-04T00:09:35+5:30
राज्य शासनाने सुरु केलेल्या स्मार्ट गाव योजनेअंतर्गत तालुका स्मार्ट ग्रामसाठी पुरस्कार रक्कम म्हणून परभणी जिल्हा परिषदेला ११ लाख ३४ हजार ८४६ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्य शासनाने सुरु केलेल्या स्मार्ट गाव योजनेअंतर्गत तालुका स्मार्ट ग्रामसाठी पुरस्कार रक्कम म्हणून परभणी जिल्हा परिषदेला ११ लाख ३४ हजार ८४६ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी पर्यावरण संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृद्ध व संपन्न गावांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने २०१०-११ पासून पर्यावरण संतुलित ग्राम योजना राबविण्यात येत होती. या योजनेचे रुपांतर आता स्मार्ट ग्राम योजनेत करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक तालुक्यातील १ आणि प्रत्येक जिल्ह्यातून एका ग्रामपंचायतीची स्मार्ट ग्राम म्हणून निवड करण्यात येते. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी २०१७-१८ मध्ये ५३ कोटी ८० लाख रुपयांची रक्कम अर्थसंकल्पात तरतूद केली होती. एप्रिल- मे महिन्यात स्मार्ट ग्राम योजनेसाठी एकूण तरतुदीपैकी ८ कोटी ९६ लाख ६७ हजार रुपये एवढी रक्कम वितरित करण्यात आली. त्यातून प्रति जिल्हा ३१ लाख या प्रमाणे जिल्हा परिषदांना निधी वितरित करण्यात आला होता. तसेच तालुकास्तरीय स्मार्ट ग्रामसाठी प्रत्येक गावांना पारितोषिक म्हणून १० लाख रुपयांचा निधीही वितरित झाला होता. या निधीतून राज्यातील ३५० तालुक्यांमधील स्मार्ट ग्राम निवड झालेल्या ग्रामपंचायतींना १ मे २०१७ रोजी प्रमाणपत्र व पारितोषिक वितरित करण्यात आले. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार मार्च २०१८ हा अखेर ४ कोटी ४१ लाख ३३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध असल्याने राज्यातील स्मार्ट गाव म्हणून निवड झालेल्या गावांना १ कोटी २६ लाख ९४ हजार रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या संदर्भातील शासनादेश ग्रामविकास विभागाने नुकताच निर्गमित केला आहे. या शासन आदेशानुसार परभणी जिल्हा परिषदेला ११ लाख ३४ हजार ८४६ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
९ गावांना होणार निधीचे वितरण
स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यातून १ ग्रामपंचायत स्मार्ट ग्राम म्हणून निवडली जाणार आहे. जिल्ह्यात ९ तालुके असून या तालुक्यांमधील प्रत्येकी १ या प्रमाणे ९ गावांना उपलब्ध झालेला निधी वितरित होणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावाने हा निधी प्राप्त झाला आहे.
मुलींच्या वसतिगृहासाठी ११.७० लाख रुपयांचा निधी
आर्थिक वर्ष संपले असून मागील आर्थिक वर्षातील निधीचे वितरण राज्य शासनाकडून केले जात आहे. त्यानुसार केंद्र पुरस्कृत बहुक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातील शहर विकास कामांच्या अंमलबजावणीअंतर्गत मुलींच्या वसतिगृहासाठी ११ लाख ७० हजार रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने हा आदेश काढला आहे.
१२ व्या पंचवार्षिक योजनेत केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने परभणी शहरात मुलींसाठी १०० प्रवेश क्षमतेच्या वसतिगृहाला मंजुरी दिली होती. त्यासाठी १ कोटी ५९ लाख ५४ हजार रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. या अंतर्गत केंद्र शासनाचा १ कोटी ३३ लाख ७४ हजार रुपयांचा हिस्साही जिल्हाधिकाºयांना वर्ग करण्यात आला आहे. मात्र राज्य शासनाचा हिस्सा वितरित होणे बाकी होते.
राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने नुकतीच ११ लाख ७० हजार रुपयांची रक्कम जिल्हाधिकाºयांना वितरित केली आहे. या रक्कमेतून मोकळ्या जागेवरील छतासाठी प्रोफलेक्ससीट बसविण्यासाठी १ लाख ७० हजार रुपये आणि वसतिगृह इमारत बांधकाम या कामासाठी राज्याची रक्कम म्हणून १० लाख रुपये असे ११ लाख ७० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रमांतर्गत शहराला हा निधी मिळाला आहे.