परभणी: वर्षभरात ११०० नैसर्गिक प्रसुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:27 PM2019-04-09T23:27:08+5:302019-04-09T23:27:44+5:30

येथील उपजिल्हा रुग्णालयाने आरोग्य सेवेत आपला वेगळा ठसा उमटविला असून वर्षभरात ११३३ नैसर्गिक प्रसुती झाल्या. तर १२८ सिझर करुन सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.

Parbhani: 1100 natal delivery during the year | परभणी: वर्षभरात ११०० नैसर्गिक प्रसुती

परभणी: वर्षभरात ११०० नैसर्गिक प्रसुती

Next

मोहन बोराडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): येथील उपजिल्हा रुग्णालयाने आरोग्य सेवेत आपला वेगळा ठसा उमटविला असून वर्षभरात ११३३ नैसर्गिक प्रसुती झाल्या. तर १२८ सिझर करुन सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.
सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयातील कामकाजाचा मागील एक वर्षाचा आढावा घेतला असता या रुग्णालयात विविध सेवा देण्यात येतात. त्यामुळे सेलू तालुक्यासह परतूर, माजलगाव, मंठा, सातोना, आष्टी यासह जालना जिल्ह्यातील काही गावांमधील गर्भवती महिला प्रसुतीसाठी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल होतात. अनेक गर्भवती महिलांचे सिझर करण्याची गरज निर्माण होते. अशावेळी सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना खाजगी दवाखान्यात सिझर करण्यासाठी किमान ३५ ते ४० हजार रुपयांचा खर्च लागतो. हा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात गरजू गर्भवती महिलांच्या औषधींचा किरकोळ खर्च वगळता सिझर करण्यासाठी परभणी येथून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.शरद वाघ, भूलतज्ज्ञ डॉ. प्रशांत पाचलेगावकर, सर्जन डॉ.अर्जून पवार यांना पाचारण करुन सिझर केले जाते. विशेष म्हणजे ही सुविधा तालुकास्तरावरील रुग्णालयात मिळत असल्याने सेलू येथील रुग्णालयात गर्भवती महिलांची संख्या उपचारासाठी वाढली आहे. या रुग्णालयात नैसर्गिक प्रसुतीचे प्रमाणही अधिक आहे. त्याच बरोबर वर्षभरात महिलांच्या गर्भपिशवीच्या २८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच बिनटाका स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया ९७ करण्यात आल्या असून उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तर लहान मुलांच्या ८२ शस्त्रक्रिया वर्षभरात झाल्या आहेत.
रुग्णालयात रक्त साठवणूक केंद्रामधून १०४ रुग्णांना वेळीच मदत करण्यात आली आहे. रुग्णालयात ७ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. वर्षभरात १०३८ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. रुग्णालयात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उभारलेले उद्यान तसेच बालउद्यान हे आकर्षण ठरत आहे.
एकंदरीत जिल्ह्यातील इतर रुग्णालयांच्या बाबतीत विचार केला असता सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयावर रुग्णांचा विश्वास वाढत असल्याचे दिसून येत आहे.
रुग्णालयाला मिळाले दोन पुरस्कार
४ सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. दररोज तीनवेळा रुग्णालयात साफसफाई केली जाते. गरजू रुग्णांसाठी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे या रुग्णालयाला सलग दोन वर्षे डॉ.आनंदीबाई जोशी पुरस्कार तसेच कायाकल्प पुरस्कार मिळाल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे यांनी दिली. त्याच बरोबर वर्षभरात मुलींचा जन्मदरही समाधानकारक असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.

Web Title: Parbhani: 1100 natal delivery during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.