परभणी: स्टँडअप इंडिया योजनेतून १२ जण बनले उद्योजक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:15 AM2019-07-14T00:15:20+5:302019-07-14T00:16:27+5:30

केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेतून परभणी जिल्ह्यातील १२ जणांना बँक आॅफ बडोदाने ३ कोटी ९८ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले असून, या माध्यमातून सदरील लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या गॅस टँकरला आॅईल कंपन्यांनी पहिल्याच दिवसापासून आपल्या सेवेत कंत्राटी तत्त्वावर रुजू करून घेतले आहे़ परिणामी, परभणीचे १२ जण एका झटक्यात उद्योजक बनले आहेत़

Parbhani: 12 people have become entrepreneurs from the standup India scheme | परभणी: स्टँडअप इंडिया योजनेतून १२ जण बनले उद्योजक

परभणी: स्टँडअप इंडिया योजनेतून १२ जण बनले उद्योजक

Next

अभिमन्यू कांबळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी :केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेतून परभणी जिल्ह्यातील १२ जणांना बँक आॅफ बडोदाने ३ कोटी ९८ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले असून, या माध्यमातून सदरील लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या गॅस टँकरला आॅईल कंपन्यांनी पहिल्याच दिवसापासून आपल्या सेवेत कंत्राटी तत्त्वावर रुजू करून घेतले आहे़ परिणामी, परभणीचे १२ जण एका झटक्यात उद्योजक बनले आहेत़
डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त केंद्र सरकारने २०१५ मध्ये स्टँडअप इंडिया या योजनेची घोषणा केली होती़ या योजनेंतर्गत अनुसूचित जाती/जमातीचे उद्योजक आणि महिला उद्योजिका निर्माण करण्याचे ध्येय ठरविण्यात आले होते़ त्याअनुषंगाने केंद्र शासनाने निधीची तरतूद केली़ त्या अंतर्गत सदरील रक्कम सीडबीकडे वर्ग करण्यात आली़ सीडबीने याच रक्कमेचे सुरक्षा हमी कवच तयार केले़ त्यानुसार लाभार्थ्यांना जे कर्ज दिले जाईल, त्याची सीडबीकडून हमी घेण्यात आली़ या योजनेंतर्गत संबंधित लाभार्थ्यांनी त्यांचा प्रकल्पाच्या १० टक्के हिस्सा द्यायचा असून, उर्वरित ९० टक्के रक्कम त्यांना बँकांमार्फत कर्ज स्वरुपात देण्याचे निश्चित करण्यात आले़ एकूण कर्जाच्या १५ टक्के अनुदान राज्य शासन तर २५ टक्के अनुदान केंद्र शासनाच्या के्रडिट लिंकड् कॅपिटल सबसिडी अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आले़ त्यामुळे जवळपास ४० टक्के अनुदान या योजनेंतर्गत संबंधित लाभार्थ्यांना देण्यात आले़ या योजनेच्या अनुषंगाने दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स आणि बडोदा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी जिल्ह्यातील अनुसूचित जाती/जमातीतील तरुणांना उद्योजक बनविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला़ त्या अंतर्गत परभणी येथील प्रकाश प्रल्हाद साळवे, प्रफुल्ल तुकाराम पैठणे, संजय मोतीराम खिल्लारे, प्रज्ञा श्रीरंग मुळे, आकाश सुरेश सदावर्ते, हर्षवर्धन सखाराम मस्के, वंदना अशोक वाढे, परमेश्वर भास्कर वाघमारे, सिद्धांत दासराव जगतकर, राजू घोडके, भीमराव सावतकर आणि सचिन विश्वनाथ महामुनी यांनी परभणी येथील शिवाजी चौकातील बँक आॅफ बडोदाकडे कर्जाची मागणी केली़ येथील मुख्य व्यवस्थापक अशोक पिल्लेवार यांनीही केंद्र शासनाची स्टँडअप योजना यशस्वीपणे राबवावी, या अनुषंगाने कर्ज देण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार १२ लाभार्थ्यांनी प्रत्येकी १० टक्के रक्कम भरली़ तर उर्वरित प्रत्येकी ३३ लाख २० हजार रुपयांचे कर्ज त्यांना बडोदा बँकेने उपलब्ध करून दिले़ त्यानंतर त्यांनी या रक्कमेतून एलपीजी गॅसचे १२ टँकर खरेदी केले़ दरम्यानच्या काळात केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या बीपीसीएल, एचपीसीएल, आयओसीएल या आॅईल कंपन्यांच्या वाहनाद्वारे गॅस वितरणाच्या निविदा निघाल्या़ त्यामध्ये दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्सने (डिक्की) या संदर्भातील निविदा भरण्यापासून ते सदरील प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रत्येक लाभार्थ्याला मदत केली़ त्यानंतर या १२ जणांच्या निविदा मंजूर होऊन त्यांचे एलपीजी गॅसचे टँकर वार्षिक कंत्राटी तत्त्वावर या आॅईल कंपन्यांनी सेवेत घेतले़ दरम्यान, शासनाच्या या योजनेतून खरेदी करण्यात आलेल्या टँकरचा हस्तांतरणाचा सोहळा पुणे येथे १२ जुलै रोजी पार पडला़ यावेळी ‘डिक्की’चे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे, बँक आॅफ बडोदाचे पुणे झोनचे मुख्य व्यवस्थापक नितीन जमानिक, डिक्कीचे उपाध्यक्ष मनोज आदमाने, पुणे प्रेसिंडंट अशोक ओहळ, मराठवाडा विभागाचे प्रमुख प्रफुल्ल पंडित, परभणीचे जिल्हा समन्वयक प्रफुल्ल पैठणे, प्रकाश साळवे आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोलताना कांबळे म्हणाले की, राज्य सरकारच्या नवीन धोरणानुसार राज्य सरकार १५ टक्के आणि केंद्र शासन २५ टक्के असा एकूण ४० टक्के सहभाग शासन देणार असल्याने या पुढील काळात शासनाच्या सहयोगाने डिक्की दलित, आदिवासी समाजातील तरुणांना व्यावसायात सक्षमपणे उभे करण्याचे काम करणार आहे़ यावेळी जमानिक म्हणाले, बँका सर्वसामान्यांना मदत करण्यासाठीच आहेत़ उपेक्षित माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम बँका करू शकतात आणि ते डिक्कीने आमच्याबरोबरच मिळून काम करण्याचे ठरविल्याने आम्हाला आज गरजू लोकांना मदत करता येत आहे़
दरमहा किमान ४० हजारांचे उत्पन्न
केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेतून १२ जणांनी घेतलेले टँकर पहिल्याच दिवसापासून कंत्राटी तत्त्वावर बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएल या आॅईल कंपन्यांनी सेवेत घेतले आहेत़ या माध्यमातून या १२ जणांना सर्व खर्च जाता दरमहा किमान ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे़ या सर्व प्रक्रियेसाठी त्यांना दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्सचे पुरेपूर सहकार्य लाभले़ संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या सक्रिय सहभागामुळे ही प्रक्रिया यशस्वी झाली़
केंद्र शासनाच्या स्टँडअप योजनेनुसार सर्वसामान्य व्यक्तीला उद्योजक बनण्यासाठी मदत करण्याची बँक आॅफ बडोदाची कायम प्रामाणिक भूमिका आहे़ परभणीतील १२ जणांनाही याच व्यापक दृष्टीकोनातून पतपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला़ ज्यामुळे संबंधितांना दीर्घकालीन उत्पन्न मिळणार आहे़ परिणामी, शासनाचा आणि बँकेचा हेतू साध्य होणार आहे़
- अशोक पिल्लेवार,
मुख्य व्यवस्थापक, बँक आॅफ बडोदा
‘डिक्की’ने सोपविलेल्या जबाबदारीनुसार सक्षम उद्योजक निर्माण करणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून लाभार्थ्यांची निवड शासनाच्या निकषानुसार करण्यात आली़ या पुढील काळातही अनुसूचित जाती, जमातीच्या युवकांना शासनाच्या योजनांच्या लाभ मिळवून देण्यासाठी व त्यांना उद्योजक बनविण्यासाठी डिक्कीचा पुढाकार राहणार आहे़
-प्रफुल्ल पैठणे, जिल्हा समन्वयक, डिक्की

Web Title: Parbhani: 12 people have become entrepreneurs from the standup India scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.