परभणी : १४० ग्राहकांची वीज थकबाकीमुळे तोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:50 AM2018-10-25T00:50:09+5:302018-10-25T00:51:18+5:30
शहरातील वीज ग्राहकांकडे थकबाकी वाढत असून वसुलीत शहराचा क्रमांक तळाला गेला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने मंगळवारपासून थकबाकी वसुली मोहीम हाती घेत १४० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. आणखी २७०० थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी) : शहरातील वीज ग्राहकांकडे थकबाकी वाढत असून वसुलीत शहराचा क्रमांक तळाला गेला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने मंगळवारपासून थकबाकी वसुली मोहीम हाती घेत १४० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. आणखी २७०० थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडली जाणार आहे.
शहरात महावितरणचे ९ हजार ८०० ग्राहक आहेत. यातील तब्बल २ हजार ७०० ग्राहकांनी मार्चनंतर एकाही वीज बिलाचा भरणा केलेला नाही. या ग्राहकांकडे अडीच कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे वीज बिल वसुलीत शहराचा क्रमांक शेवटचा आहे. शहराची एकूण वीज बिल थकबाकी ४ कोटी २२ लाख झाली आहे. परिणामी भारनियमनात वाढ केली जात आहे. मंगळवारपासून महावितरणकडून वीज बिल थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई केली जात आहे. महिन्याला शहरातील वीज ग्राहक १ कोटी २० हजारांची वीज वापरतात. त्या तुलनेत केवळ ४० लाख रुपयांचा भरणा ग्राहकांंकडून होतो. त्यामुळे दर महिन्याला थकबाकीचा आकडा फुगत आहे. महावितरण कंपनीने वसुलीसाठी ६ पथके स्थापन केली आहेत. या पथकात ३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. परभणी व इतर शहरातील महावितरणचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. ३० आॅक्टोबरपर्यंत वसुली मोहीम चालविणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता राजेश मेश्राम यांनी दिली.
केवळ दोन हजार : ग्राहक भरतात नियमित बिल
शहरातील ९ हजार ८०० ग्राहकांपैकी केवळ २ हजारच ग्राहक नियमित वीज बिलाचा भरणा करतात. त्यामुळे शहराची थकबाकी साडेचार कोटींच्या घरात आहे. तसेच वसुलीमध्ये शहर तळाला आहे. त्यामुळे शहरात सद्यस्थितीत सहा तास भारनियमन केले जात आहे. गरज भासल्यास सक्तीचे भारनियमन वाढवून ९ तास केले जाण्याची शक्यता आहे.