परभणी: २ महिन्यात १५ बैलजोड्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 12:42 AM2019-03-05T00:42:28+5:302019-03-05T00:42:54+5:30
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहा खेड्यातून दोन महिन्यात पंधरा बैलजोडी चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबतची नोंद पोलीस ठाण्यात आहे; परंतु, पोलीस प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने बोरी ग्रामस्थांनी नुकतीच पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांची भेट घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी) : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहा खेड्यातून दोन महिन्यात पंधरा बैलजोडी चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबतची नोंद पोलीस ठाण्यात आहे; परंतु, पोलीस प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने बोरी ग्रामस्थांनी नुकतीच पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांची भेट घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
जिंंतूर तालुक्यातील बोरी येथे मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेला परिसरातील २५ ते ३० खेडे जोडली गेली आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने अनुचित प्रकार टाळण्यासाठी बोरी येथे पोलीस ठाण्याची निर्मिती केली; परंतु, पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या उदासिन भूमिकेचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. बोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया कौसडी, रोहिला पिंपरी, कोक, गोंधळा, कान्हड, बोरी, माक, हट्टा येथील शेत आखाड्यावरून गेल्या दोन महिन्यांपासून पंधरा बैलजोड्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे कोक येथील बैलजोडी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका आरोपीस पकडून बोरी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्या आरोपीने बैलजोडी चोरी केल्याचे कबूलही केले; परंतु, अद्यापपर्यंत त्या आरोपीकडून बैल कोणाला विकले ? याबाबत पोलिसांना उलगडा करण्यात यश आलेले नाही. त्यानंतर पुन्हा तीन बैलजोडी चोरीच्या घटना घडल्या. यामध्ये कुपटा, पिंपळगाव गायके या ठिकाणी तर चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता.
गेल्या दोन महिन्यात पंधरा बैलजोडी बोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया कार्यक्षेत्रातील चोरीला गेल्या आहेत. पशुपालकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन आपली कैफियत मांडली आहे; परंतु, पोलीस प्रशासनाच्या तपास कामात होणाºया हलगर्जीपणामुळे पशूपालक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पशूपालकांचे पोलीस अधीक्षकांना साकडे
बोरी पोलीस ठाण्यांतर्गत दिवसेंदिवस बैल चोरीच्या घटनेत वाढ होत आहे; परंतु, स्थानिक पोलीस प्रशासनाकडूून कोणतीही ठोस पावले उचलण्यात येत नाहीत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडलेल्या आरोपीने गुन्हा कबूल करूनही पुढील तपास होत नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी याकडे लक्ष देऊन बैलजोडी चोरांचा बंदोबस्त करावा व पशूपालकांना भयमुक्त करावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. निवेदनावर गणेशराव बहिरट, दीपक बहिरट, विष्णू बहिरट, राजेभाऊ लेंगुळे, सुदाम बहिरट, मधुकर बहिरट, आश्रोबा बहिरट, बाळासाहेब बहिरट, सोपान इक्कर आदींच्या स्वाक्षºया आहेत.
गावातही घडले चोरीचे प्रकार
ज्या गावात पोलीस ठाणे आहे, त्या गावातील ग्रामस्थ निर्धास्त असतात, असे म्हटले जाते; परंतु, जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पोलीस ठाणे अपवादात्मक ठरत आहे. गेल्या आठवड्यात बोरी येथील प्रभाकर शिंपले यांच्या घरासमोर बांधलेली बैलजोडी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेला आठवडाभराचा कालावधी उलटून गेला आहे; परंतु, अद्यापही पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही.