परभणी : साडेदहा कोटी कंत्राटदाराच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:32 AM2020-02-12T00:32:07+5:302020-02-12T00:32:11+5:30

शहरातील जवळपास ३९० कोटी रुपये खर्च करुन कार्यान्वित होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत ३५ हजार नळधारकांचे १० कोटी ५० लाख रुपये काहीही न करता कंत्राटदाराच्या घशात घालण्याचा खटाटोप मनपात करण्यात येत असल्याचा आरोप सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख यांनी केला आहे.

Parbhani: 1.5 crore contractor's throat | परभणी : साडेदहा कोटी कंत्राटदाराच्या घशात

परभणी : साडेदहा कोटी कंत्राटदाराच्या घशात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील जवळपास ३९० कोटी रुपये खर्च करुन कार्यान्वित होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत ३५ हजार नळधारकांचे १० कोटी ५० लाख रुपये काहीही न करता कंत्राटदाराच्या घशात घालण्याचा खटाटोप मनपात करण्यात येत असल्याचा आरोप सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख यांनी केला आहे.
महानगरपालिकेने नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत नागरिकांना प्रत्येक नळ जोडणीसाठी २ हजार रुपये अनामत रक्कम व ९ हजार रुपये एजन्सीसाठी नळ जोडणी, मीटर, रस्ता दुरुस्ती, १५ मीटर पाईप आदी साहित्य देण्यासाठी असे एकूण ११ हजार रुपये आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला जात आहे. मनपात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आणि विरोधी पक्षात असताना या पक्षाचे पदाधिकारी या विषयावर गप्प बसले असताना सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकानेच आता या योजनेचा ढिसाळ कारभार आता चव्हाट्यावर आणला आहे. या संदर्भात काँग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख यांनी सांगितले की, नवीन नळ जोडणीसाठी २ हजार रुपये अनामत व ९ हजार रुपये नळ जोडणी देण्यासाठी मनपाने नियुक्त केलेल्या एजन्सीला नागरिकांनी द्यायचे आहेत. यामध्ये सदरील खाजगी एजन्सी १५ मीटर पाईप, कपलिंग, पाण्याचे मीटर व रस्ता दुरुस्तीसाठी काँक्रिट वापरणे आदी कामे करणार आहे. शहरामध्ये नवीन पाईपलाईन रस्त्याच्या एका बाजुला टाकलेली असून नागरिकांना नळ जोडणी घेण्यासाठी तीन मीटर पाईप लागणार आहे, असे असताना नागरिकांकडून सक्तीने १५ मीटरचे पैसे एजन्सीला द्यावे लागणार आहेत. तसेच एका बाजूस असलेल्या नळजोडणी धारकास रस्ता खोदण्याचे काम पडणार नसतानाही रस्ता दुरुस्तीचे व पुर्ण खोदकामाचे पैसे एजन्सीला द्यावे लागणार आहेत. त्यामुळे शहरातील जवळपास ३५ हजार नळधारकांचे अंदाजे प्रत्येकी तीन हजार रुपये काहीही काम न करता एजन्सीला फुकटात मिळणार आहेत. म्हणजेच जवळपास १० कोटी ५० लाख रुपये हे आयते एजन्सीच्या खिशात जाणार आहेत. त्यामुळे सदरील तीन हजार रुपयांची रक्कम एकूण रक्कमेतून कपात करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. देशमुख यांची मागणी योग्य असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहेत.
२६ हजार नळधारकांच्या अनामत रकमेवर मनपाचा कब्जा
४महानगरपालिकेकडील अधिकृत नोंदीनुसार शहरात सध्या २६ हजार नळजोडणीधारक आहेत. प्रत्येक नळ जोडणीधारकाने नळ जोडणी घेताना मनपाकडे अनामत रक्कम जमा केलेली आहे. नवीन योजनेंतर्गत नळ जोडणी घेताना जुन्या रक्कमे संदर्भात कोणतीही भूमिका मनपाने घेतलेली नाही. त्यामुळे प्रत्येक नळ जोडणीधारकास मनपाने निश्चित केलेली ११ हजार रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे ज्या २६ हजार नळ जोडणी धारकांनी अनामत रक्कम मनपाकडे अनेक वर्षापासून जमा केली होती. त्या रक्कमेवर मनपाचा कब्जा झाला आहे. सदरील रक्कमही अनामत रक्कमेमधून वजा करावी, अशी मागणी नगरसेवक सचिन देशमुख यांनी केली आहे.
एजन्सीला झुकते माप
४नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या एजन्सीला सत्ताधारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून झुकते माप देण्यात येत असल्याची चर्चा मनपात सुरु आहे. या संदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वीच एजन्सी निश्चित करण्यात आली होती व सदरील एजन्सी ही यापूर्वीच पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने मनपाशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या संदर्भातील एजन्सी निवडत असताना स्पर्धाच झाली नसल्याचे समजते. त्यामुळे सदरील एजन्सीला झुकते माप देण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

Web Title: Parbhani: 1.5 crore contractor's throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.