परभणी : १६ रॉकेल विक्रेत्यांचे परवाने निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:28 AM2018-12-12T00:28:43+5:302018-12-12T00:29:59+5:30
केरोसीन वाटपात अनियमितता केल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील १६ रॉकेल विक्रेता दुकानदारांचे किरकोळ विक्री परवाने जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशनी पगारे यांनी निलंबित केले आहेत. १० डिसेंबर रोजी या संदर्भातील कारवाईचे आदेश संबंधितांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : केरोसीन वाटपात अनियमितता केल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील १६ रॉकेल विक्रेता दुकानदारांचे किरकोळ विक्री परवाने जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशनी पगारे यांनी निलंबित केले आहेत. १० डिसेंबर रोजी या संदर्भातील कारवाईचे आदेश संबंधितांना देण्यात आले.
जिंतूर तालुक्यातील केरोसीन वाटपातील अनियमिमतेप्रकरणी शामसुंदर सुखदेव सारडा यांनी राज्य शासनासह जिल्हाधिकाऱ्यांकडे ३१ मे रोजी तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या वतीने १० आॅक्टोबर रोजी किरकोळ रॉकेल विक्रेता रेशन दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर संबंधित दुकानदारांनी याच महिन्यात आपले खुलासे जिंतूर तहसील कार्यालयामार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे सादर केले होते.
यातील अनेकांचे खुलासे समाधानकारक नसल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशनी पगारे यांनी १६ रेशन दुकानदारांचे परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेतला. तसेच संबंधित विक्रेत्यांच्या संपूर्ण अनामत रक्कमा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये चारठाणा येथील २, सोस येथील २ तसेच भांबरी, जोगवाडा, बेलखेडा, अकोली, पिंपरी खु., कान्हा, कोलदांडी, हलविरा, पिंपराळा, कवडा तांडा, रायखेडा, पांढरगळा येथील रेशन दुकानदारांना समावेश आहे. ज्या रेशन दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, त्या गावांमध्ये रॉकेल वितरणाची पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश जिंतूर येथील तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
या संदर्भातील कारवाई पुर्ण करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशनी पगारे यांनी जिंतूर तहसीलदारांना दिले आहेत. पुरवठा विभागाच्या या कारवाईमुळे रेशनदुकानातून रॉकेल विक्री करणाºया दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
रॉकेल वितरणात अनियमितता
ज्या १६ रॉकेल विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, त्यातील काही विक्रेत्यांनी रॉकेल वितरणात अनियमितता केल्याचा प्रकार चालू वर्षात जानेवारी २०१८ पासून समोर आला होता. साठा व वाटप नोंद वही तपासणीच्या वेळी उपलब्ध करुन न देणे, केरोसीन आवक- विक्री व शिलकीचा अहवाल तहसील कार्यालयास सादर न करणे, नोंदवहीत खाडाखोड करणे, केरोसीन विक्री नोंदवहीवर काही शिधापत्रिका धारकांच्या स्वाक्षºया न घेणे, केरोसीन परवाना प्रत उपलब्ध करुन न देणे आदी विविध कारणांनी या विक्रेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे या संदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.