परभणी : गंगाखेड तालुक्यात पोलीस पाटलांची १७६ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:56 AM2018-09-26T00:56:02+5:302018-09-26T00:57:04+5:30
पोलीस आणि नागरिकांमधील दुवा म्हणून काम करणाऱ्या पोलीस पाटलांची जिल्ह्यात १७६ पदे रिक्त असून ही पदे भरण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी ) : पोलीस आणि नागरिकांमधील दुवा म्हणून काम करणाऱ्या पोलीस पाटलांची जिल्ह्यात १७६ पदे रिक्त असून ही पदे भरण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत.
ग्रामीण भागामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची माहिती देण्याचे काम पोलीस पाटलांमार्फत केले जाते. पोलीस ठाण्यांतर्गत २० ते २५ गावांचा समावेश असतो. प्रत्येक गावापर्यंत पोलीस पोहोचू शकत नाहीत.
एखाद्या गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आशा वेळी पोलीस पाटील पोलीस प्रशासनाच्या मदतीला येतात. गावातील माहिती पोलीस पाटलामार्फत पोलिसांपर्यंत पोहचविली जाते. अनेक प्रकरणांमध्ये तपासासाठी लागणारी छोटी-मोठी माहितीही पोलीस पाटील उपलब्ध करून देतात. गावामध्ये पोलीस प्रशासनाविषयी सकारात्मक दृष्टकोन निर्माण करण्याचे कामही पोलीस पाटलांमार्फत होत असते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस पाटील हा महत्त्वाचा घटक आहे. जिल्ह्यात पोलीस पाटलांची एकूण ८१३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १७६ पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत हालचाली सुरु झाल्या आहेत.
गंगाखेड उपविभागात सर्वाधिक रिक्त पदे
जिल्ह्यात चार उपविभाग असून गंगाखेड उपविभागात रिक्त पदांची संख्या अधिक आहे. या उपविभागामध्ये पोलीस पाटलांची २६६ पदे मंजूर असून त्यापैकी ६५ पदे रिक्त आहेत. परभणी उपविभागामध्ये १२९ पदांपैकी २० पदे रिक्त आहेत. पाथरी उपविभागात १६६ पैकी ४५ आणि सेलू उपविभागात २५२ पैकी ४६ पदे रिक्त आहेत. त्यामुळे या गावांमधील गुन्हे विषयक घटनासंदर्भात माहिती घेताना पोलीस कर्मचाºयांची धावपळ होत आहे.