परभणी : शनिवारी दाखल झाले १९ संशयित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 11:16 PM2020-04-11T23:16:15+5:302020-04-11T23:16:39+5:30
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, या उद्देशाने येथील जिल्हा रुग्णालयात संशयित रुग्णांची तपासणी केली जात असून ११ एप्रिल रोजी १९ नवीन संशयित दाखल झाले आहेत. त्याच प्रमाणे २४ संशयितांचे स्वॅब नमुने शनिवारी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढू नये, या उद्देशाने येथील जिल्हा रुग्णालयात संशयित रुग्णांची तपासणी केली जात असून ११ एप्रिल रोजी १९ नवीन संशयित दाखल झाले आहेत. त्याच प्रमाणे २४ संशयितांचे स्वॅब नमुने शनिवारी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. विविध भागातून संशयित जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि तालुकास्तरावरील ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत आहेत. शनिवारी २४ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. जिल्हा रुग्णालयात आतापर्यत २६६ संशयितांचे स्वॅब घेण्यात आले असून १२५ स्वॅब नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ३५ जणांचे अहवाल अजूनही प्रलंबित आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ३०६ संशयितांची नोंद आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. त्यापैकी १२३ जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. संसर्गजन्य कक्षामध्ये २८ जण दाखल झालेले आहेत. तर १५५ जणांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्याची माहिती प्रशसनाने दिली.
दिल्ली प्रकरणातील संशयितांचे स्वॅब नमुने दुसऱ्यांदा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पहिला स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ७ दिवसांच्या कालावधीने दुसरा स्वॅब पाठविण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार एका व्यक्तीचा दुसºयांदा स्वॅब पुनर्तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. ११ एप्रिलपर्यत जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली.
पाथरीत चौघे जण होम क्वारंटाईन
४पाथरी : तालुक्यातील डोंगरगाव व गुंज येथे प्रत्येकी दोघे परजिल्ह्यातून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने मिळाली. त्यानंतर ११ एप्रिल रोजी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.के.पी.चौधरी यांनी दिली. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच बाहेर जिल्ह्यातून आलेल्या ९ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. तसेच १० एप्रिल रोजी डोंगरगाव येथील दोघांनाही होम क्वारंटाईन करण्यात आले होते.
‘ती’ व्यक्ती शेतातच क्वारंटाईनमध्ये
४देवगावफाटा: सेलू तालुक्यातील रायपूर येथील एक आजारी व्यक्ती पुणे येथील रुग्णालयात उपचार घेऊन ११ एप्रिल रोजी गावी परतला. त्यानंतर या व्यक्तीची वालूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.वैभव कांबळे व त्यांच्या सहकारी कर्मचाºयांनी तपासणी केली. त्यानंतर त्याला शेतामध्ये होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. १५ दिवसांपूर्वी या व्यक्तीला पुण्यातील रुग्णालयातून सुटी मिळाली होती; परंतु, लॉकडाऊनमुळे सदरील व्यक्ती पुणे येथे नातेवाईकांसह अडकून पडला होता. रायुकाँ जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर गाडेकर व पप्पु गाडेकर यांच्या प्रयत्नांमुळे सदरील व्यक्ती गावी परतला.