परभणी : ५० बालकांची शारीरिक तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:25 AM2019-10-15T00:25:04+5:302019-10-15T00:27:07+5:30
येथील थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपच्या वतीने जिल्ह्यातील ५० थॅलेसेमियाग्रस्त बालकांची १३ आॅक्टोबर रोजी मोफत रक्त व शारीरिक तपासणी करण्यात आली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपच्या वतीने जिल्ह्यातील ५० थॅलेसेमियाग्रस्त बालकांची १३ आॅक्टोबर रोजी मोफत रक्त व शारीरिक तपासणी करण्यात आली़
थॅलेसेमिया हा रक्ताचा गंभीर अनुवंशिक आजार असल्याने हा आजार झालेल्या बालकांना प्रत्येक १५ दिवसांनी रक्त द्यावे लागते़ रक्त दिल्यानंतरच ही बालके जीवंत राहू शकतात़ वारंवार रक्त चढविल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढते़ त्यामुळे अशा बालकांची नियमित शारीरिक तपासणी करणे गरजेचे असल्याने थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपने ४ वर्षांपासून मोफत तपासणीचा हा उपक्रम सुरू केला आहे़
१३ आॅक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील थॅलेसेमिया डे केअर सेंटरमध्ये बालकांच्या रक्त तपासण्या व शारीरिक तपासण्या करण्यात आल्या़ यावेळी बालरोग तज्ज्ञ डॉ़ राजगोपाल कालानी यांनी तपासणी करण्याचे महत्त्व विशद केले़ तसेच बाळाचे आयुष्यमान वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमित आहाराची माहिती दिली़ थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपचे लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी अपंग प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती व इतर शासकीय योजनांची माहिती दिली़ या आजारातून मुक्त होण्यासाठी असलेली बोनमॅरो ट्रान्सप्लांट ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या बालकाचे पालक चंद्रशेखर पवार यांनीही मार्गदर्शन केले़
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ प्रकाश डाके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या कामी सहकार्य केले़