परभणी : नुकसान भरपाईसाठी हवेत ३१२ कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:25 AM2019-11-13T00:25:40+5:302019-11-13T00:26:31+5:30
अतिवृष्टीने बाधित झालेल्या जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या ४ लाख ५६ हजार ६९८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपयांची आवश्यकता असून, तशी मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे नोंदविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अतिवृष्टीने बाधित झालेल्या जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या ४ लाख ५६ हजार ६९८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपयांची आवश्यकता असून, तशी मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे नोंदविली आहे.
आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सोयाबिन, कापूस या प्रमुख पिकांसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याचे काम हाती घेतले. तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार ४ लाख ५६ हजार ९३३ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती, बागायती आणि फळ पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. राज्य शासनाच्या दुष्काळ अनुदान वाटपाच्या निकषानुसार जिरायती पिकांना प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांप्रमाणे अनुदान वितरित केले जाते. त्याचप्रमाणे बागायती पिकांना हेक्टरी १३ हजार ५०० आणि फळ पिकांना १८ हजार ५०० रुपये प्रति हेक्टरी नुकसान दिले जाते. या निकषानुसार जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे अनुदानाची मागणी केली आहे.
या मागणीनुसार जिल्ह्यातील जिरायती पिकांच्या नुकसानीपोटी ३०९ कोटी १९ लाख ४९ हजार रुपये, नुकसानग्रस्त बागायती पिकांसाठी २ कोटी ३२ लाख १३ हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईपोटी ९१ लाख ८३ हजार रुपयांची आवश्यकता भासणार आहे.
या तिन्ही गटातील पिकांसाठी ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपयांची आवश्यकता असून, तशी मागणी जिल्हा प्रशासनाने नोंदविली आहे. परभणी तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांसाठी ५५ कोटी ६४ लाख ३९ हजार रुपये, सेलू तालुक्यासाठी ३५ कोटी १ लाख २५ हजार रुपये, जिंतूर तालुक्यासाठी ४९ कोटी ९७ लाख ४७ हजार रुपये, पाथरी- २९ कोटी २८ लाख ४ हजार रुपये, मानवत २५ कोटी ५० लाख ९९ हजार रुपये, सोनपेठ १८ कोटी ९६ लाख २२ हजार रुपये, गंगाखेड ३३ कोटी ९९ लाख ५१ हजार रुपये, पालम २८ कोटी ७१ लाख २६ हजार रुपये आणि पूर्णा तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांसाठी ३५ कोटी ३४ लाख ९६ हजार रुपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तातडीने करुन विभागीय आयुक्तांकडे निधीची मागणी केली आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारची स्थापना झाली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नोंदविलेली मागणी कधी पूर्ण होते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र प्रत्यक्ष मदतीसाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवसांची प्रतिक्षाच करावी लागेल, असे दिसते.
साडेचार लाख हेक्टरवरील : जिरायती पिके अतिवृष्टीमुळे झाली बाधित
४यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ५ लाख ५८ हजार ३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. अतिवृष्टीमध्ये ४ लाख ५४ हजार ६९८ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
४त्याचप्रमाणे १७१९ हेक्टर क्षेत्रावरील बागायती पिकांचे आणि ५१५ हेक्टर क्षेत्रावरील फळ पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने तयार केला आहे.
४परभणी तालुक्यामध्ये ८० हजार ५५०, सेलू ५१ हजार २१३, जिंतूर ७३ हजार ३९१, पाथरी ४२ हजार ९६३, मानवत ३७ हजार ४३८, सोनपेठ २७ हजार ८७७, गंगाखेड ४९ हजार ९७५, पालम ४२ हजार १९० आणि पूर्णा तालुक्यामध्ये ५१ हजार ३३२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे़
४ही सर्व पिके राज्य शासनाच्या नुकसान भरपाईसाठी पात्र असल्याने राज्य शासनाने नुकसान भरपाईसाठी विभागीय आयुक्ताकडे निधीची मागणी केली आहे़
जिरायती पिकांसाठी लागणारा अपेक्षित निधी
४जिल्ह्यात जिरायती पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे़ त्यामुळे याच पिकांच्या नुकसान भरपाईसाठी सर्वाधिक निधी लागणार आहे़
४जिल्हा प्रशासनाने जिरायती पिकांसाठी ३०९ कोटी १९ लाख ४९ हजार रुपयांची मागणी नोंदविली आहे़ त्यात परभणी तालुक्यात ५३ कोटी ८९ लाख ७५ हजार, सेलू तालुक्यात ३४ कोटी ७० लाख ९६ हजार, जिंतूर तालुक्यात ४९ कोटी ८५ लाख ८ हजार, पाथरी २९ कोटी १५ लाख २६ हजार, मानवत २५ कोटी ४२ लाख २६ हजार, सोनपेठ १८ कोटी ९५ लाख ३६ हजार, गंगाखेड ३३ कोटी ९७ लाख ८ हजार, पालम २८ कोटी ६७ लाख ३ हजार आणि पूर्णा तालुक्यासाठी ३४ कोटी ५६ लाख ७१ हजार रुपये केवळ जिरायती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी लागणार आहेत़
४या पिकांना प्रती हेक्टरी ६ हजार ८०० रुपये या प्रमाणे नुकसान भरपाईची ही रक्कम जिल्हा प्रशासनाकडून नोंदविण्यात आली आहे़