परभणी : संचारबंदीत ४३ आरोपींवर २३ गुन्हे ; ४७ वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 11:04 PM2020-03-27T23:04:00+5:302020-03-27T23:05:26+5:30
जिल्ह्यात संचारबंदीचे उल्लंघन करुन अनावश्यक फिरणाऱ्या ४३ आरोपींवर आतापर्यंत २३ गुन्हे दाखल झाले असून ४७ वाहने पोलिसांनी जप्त केले आहेत. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात संचारबंदीचे उल्लंघन करुन अनावश्यक फिरणाऱ्या ४३ आरोपींवर आतापर्यंत २३ गुन्हे दाखल झाले असून ४७ वाहने पोलिसांनी जप्त केले आहेत. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिला आहे.
जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीचे उल्लंघन केल्यास ६ महिने ते २ वर्षापर्यंत शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. असे असतानाही अनेक नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळून आले. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अशा एकूण ४३ आरोपींवर विविध पोलीस ठाण्यामध्ये २३ गुन्हे दाखल केले आहेत. या व्यक्तींकडील ४७ वाहने जप्त करण्यात आली असून ती संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये जमा करण्यात आली आहेत.
संचारबंदी १४ एप्रिलपर्यंत देशात लागू राहणार असल्याने या संदर्भात विविध ठिकाणी नाकाबंदी, चेक पॉर्इंट व पेट्रोलिंग लावण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून यासाठी नागरिकांनी एकत्र जमू नये, याकरीता सर्व धर्मगुरुंना ते नियमित देखरेख करीत असलेल्या धार्मिकस्थळी धार्मिक विधी करण्यास परवानगी देण्यात आली असून इतर नागरिकांना मात्र त्यांच्या घरीच धार्मिक विधी करता येणार आहे. कोणीही अफवा पसरु नये.
दुध, फळे, भाजीपाला, कृषीमाल विक्री केंद्रे, किराणा दुकान, बँका, एटीएम, औषधी दुकाने, पाणीपुरवठा विभाग आदी अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. त्यामुळे विनाकारण नागरिकांनी शहरातील रस्त्यावर फिरु नये, सोशल डिस्टन्सीचे पालन करावे. ज्यांना होम कोरोनटाईन करण्यात आले आहे, त्या नागरिकांनी घरी थांबावे, कोरोनाच्या विषाणूपासून सर्र्वांची स्वत:चे संरक्षण करावे व नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी केले आहे.