परभणी : महिनाभरात दगावली २५ जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 01:03 AM2018-10-04T01:03:11+5:302018-10-04T01:05:13+5:30
तालुक्यातील शेवडी परिसरात अज्ञात आजाराची लागण झाल्याने मागील एक महिन्यात २५ जनावरे दगावली आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): तालुक्यातील शेवडी परिसरात अज्ञात आजाराची लागण झाल्याने मागील एक महिन्यात २५ जनावरे दगावली आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे़
शेवडी या गावात मागील एक महिन्यापासून दररोज एक जनावर दगावण्याची घटना घडत आहे़ २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शेषराव घनसावंत, राधाकिशन काळे, संतोष सानप, अनिबा सानप, दिनकर घुगे, बाबाराव सानप, सुधाकर सानप या शेतकºयांची जनावरे मृत्यूमुखी पडली़ या जनावरांच्या मृत्यूचे कारण मात्र समजू शकले नाही़ पशू संवर्धन विभाग जनावरांच्या लसीकरणावर लाखो रुपयांचा खर्च करीत असताना शेवडी परिसरात मात्र रोगाची माहितीच उपलब्ध होत नसल्याने जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढत आहे़
तहसील कार्यालयाने पंचनामे करून शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे़ जिंतूर पंचायत समितीचे पशू विस्तार अधिकारी डॉ़ प्रकाश आकोसे यांनी गावात भेट देऊन मृत्यू झालेल्या जनावरांची व रोगाची लागण झालेल्या जनावरांची पाहणी केली़ ४ ते ५ दिवसांनी अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण समजू शकेल, असे त्यांनी सांगितले़ जनावरांना झालेल्या अज्ञात आजारामुळे पशू पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़ पशू वैद्यकीय अधिकारी, संबंधित कर्मचारी आतापर्यंत गावात फिरकले नाहीत़ मृत जनावरांमध्ये गाय, म्हैस, बैलांचा समावेश आहे़
लसीकरणाला खो
पशूसंवर्धन विभागाच्या वतीने जिंतूर तालुक्यात जनावरांच्या लसीकरणाला खो देण्यात आला असल्यामुळे मुक्या जनावरांचे जीव धोक्यात आले आहेत़ या विभागाच्या अधिकाºयांना मात्र याचे गांभीर्य वाटत नाही़