परभणी : ग्रामीण रुग्णालयातील २५ पदांना मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:13 AM2019-06-13T00:13:43+5:302019-06-13T00:14:07+5:30
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सोनपेठ शहरात ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले. या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकामही पूर्ण झाले आहे. मात्र पदांची भरती झाली नसल्याने उद्घाटनही झाले नाही. ६ जून रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण रुग्णालयासाठी आरोग्य विभागाने २५ पदांना मान्यता दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी): सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सोनपेठ शहरात ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले. या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकामही पूर्ण झाले आहे. मात्र पदांची भरती झाली नसल्याने उद्घाटनही झाले नाही. ६ जून रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण रुग्णालयासाठी आरोग्य विभागाने २५ पदांना मान्यता दिली आहे.
सोनपेठ तालुक्यात ६५ गावांचा समावेश आहे. या गावातील रुग्णांच्या उपचारासाठी शहरात केवळ एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्याचबरोबर तालुक्यातील शेळगाव, वडगाव, डिघोळ ई., शिर्शी बु., लासीना, कान्हेगाव, खडका, नरवाडी, आवलगाव, उखळी बु., धामोणी या ठिकाणी १० उपकेंद्र आहेत. यामध्ये सामान्य रुग्णांना प्रथमोपचार मिळतो; परंतु, गंभीर रुग्णांना मात्र उपचारासाठी परळी, अंबाजोगाई व परभणीसारख्या ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुुळे सोनपेठ तालुक्यासाठी एक ग्रामीण रुग्णालय व्हावे, यासाठी सामाजिक व राजकीय शक्तींनी पाठपुरावा करून रुग्णालय मंजूर करून घेतले. ३ कोटी ७० लाख रुपयांच्या निधीतून इमारतही उभारण्यात आली; परंतु, या इमारतीत लागणाऱ्या वेगवेगळ्या पदांची मान्यताच शासनाने दिली नव्हती. त्यामुळे रुग्णांना दिलासा देण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करूनही रुग्णालयाची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
६ जूनच्या एका शासन निर्णयानुसार ग्रामीण रुग्णालयासाठी २५ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. नियमित १० पदांना मंजुरी देण्यात आली असून वैद्यकीय अधीक्षक १, वैद्यकीय अधिकारी ३, अधिपरिचारिका ३, भांडारपाल, मिश्रक व कनिष्ठ लिपिक यांचे प्रत्येकी १ पद तसेच कुशल पदांमध्ये अधिपरिचारिकांची ४ पदे, क्ष-किरण तंत्रज्ञ १, प्रयोगशाळा सहाय्यक १, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १, कनिष्ठ लिपिक १, शिपाई १ व कक्षसेवक ४, त्याचबरोबर अकुशल पदांमध्ये सफाई कामगारांच्या २ पदांना मान्यता दिली आहे. ग्रामीण रुग्णालयासाठी पदांंना मान्यता दिली तरी ही पदे लवकरात लवकर भरती करून रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची खरेदी करून ग्रामीण रुग्णालय सुुरू करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
ुरुग्णांची होणारी गैरसोय थांबवावी
सोनपेठ तालुक्यात केवळ एक प्राथमिक केंद्र असून १० उपकेंद्र आहेत. या ठिकाणी केवळ प्राथमिक उपचार केले जातात. त्यामुळे गंभीर रुग्णांना आर्थिक झळ सहन करीत परजिल्ह्यातील दवाखाना गाठावा लागतो. त्यामुळे आरोग्य विभागाने ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन करुन रुग्णांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.