परभणी :२७ लाख मे़ टन ऊस उपलब्ध होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:42 AM2018-09-06T00:42:41+5:302018-09-06T00:44:12+5:30
जिल्ह्यात यावर्षी जायकवाडी व निम्न दुधना प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने जवळपास ४५ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे़ यामधून २७ लाख ४२ हजार मे़ टन ऊस उपलब्ध होणार आहे़ उपलब्ध उसाच्या तुलनेत गाळपासाठी साखर कारखान्यांची उपलब्धता कमी असल्याने गाळपाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात यावर्षी जायकवाडी व निम्न दुधना प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने जवळपास ४५ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे़ यामधून २७ लाख ४२ हजार मे़ टन ऊस उपलब्ध होणार आहे़ उपलब्ध उसाच्या तुलनेत गाळपासाठी साखर कारखान्यांची उपलब्धता कमी असल्याने गाळपाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे़
गतवर्षी नगर व नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण १०० टक्के भरले होते़ त्यामुळे या धरणातील पाणी गोदावरी नदीपात्रात नंतरच्या काळात सोडण्यात आले़ या पाण्याचा पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम या तालुक्यांना सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात फायदा झाला़ या शिवाय सेलू तालुक्यातील निम्न दूधना प्रकल्पातही गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले़ जवळपास ९० टक्के हा प्रकल्प भरला होता़ त्यामुळे या प्रकल्पातूनही दुधना नदी व डाव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले़ या पाण्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला़ परिणामी हमखास उत्पन्न मिळणारे पीक म्हणून उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे़ गतवर्षी फक्त ९ हजार हेक्टर जमिनीवर जिल्हाभरात ऊस लागवड झाली होती़
यावर्षी मात्र तब्बल ४५ हजार ७०० हेक्टर जमिनीवर उसाची लागवड झाली आहे़ त्यामुळे यावर्षी ऊस गाळपाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो़ जिल्ह्यात एकूण ५ साखर कारखाने असून, त्यामध्ये आमडापूर येथील त्रिधारा शुगर साखर कारखान्याची २ हजार ५०० टीसीडी गाळप क्षमता आहे़ तसेच पूर्णा तालुक्यातील बळीराजा साखर कारखान्याची ३ हजार ५०० टीसीडी, गंगाखेड शुगर एनर्जी साखर कारखान्याची ६ हजार टीसीडी व पाथरी तालुक्यातील योगेश्वरी शुगर कारखान्याची १८०० टीसीडी आणि पाथरी तालुक्यातील रेणापूर येथील रेणुका शुगर लि़ साखर कारखान्याची १२५० टीसीडी गाळप क्षमता आहे़ या पाच कारखान्यांची एकूण गाळप क्षमता १५ हजार ५० टीसीडी आणि गाळप हंगाम १६० दिवसांचा गृहित धरल्यास एकूण २४ हजार ८०० मे़ टन उसाचे गाळप होवू शकतो़
यापैकी काही ऊस गुºहाळ, जनावरे, चारा व रसवंत्यांसाठी वापरला जाऊ शकतो़ त्यामुळे ऊस गाळपाचा प्रश्न उपस्थित राहणार नाही, असे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयास वाटते़ परंतु, प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी असण्याची शक्यता आहे़
जिल्ह्यात एकूण २७ लाख ४२ हजार मे़ टन ऊस उपलब्ध होवू शकतो, ही शासकीय आकडेवारी असली तरी प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक ऊस उपलब्ध होणार आहे़ अशातच सोनपेठ तालुक्यातील महाराष्ट्र शुगर कारखाना बंद असल्याने या तालुक्यातील ऊस गाळपाचा प्रश्न निर्माण होणार आहे़ त्यामुळे सोनपेठ तालुक्याचा ऊस परळीलाच जाण्याची शक्यता आहे़ परळी येथील साखर कारखान्याच्या परीक्षेत्रात अगोदरच मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झालेली आहे़ त्यामुळे तेथील ऊस संपविण्याचे परळीच्या कारखान्यासमोर आव्हान असणार आहे़ परिणामी सोनपेठ तालुक्याचा ऊस परळीचा कारखाना घेईल की नाही? हाही प्रश्न उपस्थित होत आहे़
मे महिन्यात : झाली होती आढावा बैठक
जिल्ह्यातील उसाच्या प्रश्नावर जिल्हा कृषी अधीक्षक, साखर कारखान्यांचे कृषी अधिकारी आणि साखर प्रादेशिक सहसंचालक नांदेड यांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली होती़ या बैठकीत उसाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली़ त्यामध्ये जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या पाच साखर कारखान्यांची गाळप क्षमता अधिक असल्याने शेतकºयांच्या ऊस गाळपाचा प्रश्न उभा राहण्याची शक्यता वाटत नाही, असे सांगण्यात आले़ त्यानंतर मात्र या संदर्भात आढावा बैठक झालेली नाही़ चार महिन्यानंतर जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी आहे़ परिणामी या संदर्भात पुन्हा एकदा आढावा बैठक घेण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे़