परभणी :२८ कोटींची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:18 AM2018-08-07T00:18:42+5:302018-08-07T00:20:18+5:30

केंद्र शासनाच्या दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत २८ कोटी रुपयांची कामे जिल्ह्याला मंजूर झाली; परंतु, कंत्राटदारांच्या उदासिनतेमुळे ही कामे ठप्प पडली असून, दिलेली मुदत संपण्यास एक महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने या मुदतीत कामे करणार कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे़

Parbhani: 28 crore works | परभणी :२८ कोटींची कामे ठप्प

परभणी :२८ कोटींची कामे ठप्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : केंद्र शासनाच्या दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत २८ कोटी रुपयांची कामे जिल्ह्याला मंजूर झाली; परंतु, कंत्राटदारांच्या उदासिनतेमुळे ही कामे ठप्प पडली असून, दिलेली मुदत संपण्यास एक महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने या मुदतीत कामे करणार कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे़
महावितरण कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील वीज वितरणाची व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत़ वीज पुरवठा मुबलक प्रमाणात आणि सुरळीत व्हावा, या उद्देशाने विद्युत यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी ठिक ठिकाणी कामे हाती घेतली जात आहेत़ मात्र कंत्राटदारांच्या उदासिन भूमिकेमुळे या कामांनाच बे्रक लागत आहे़
दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेचा दुसरा टप्पा जिल्ह्यात सुरू आहे़ या अंतर्गत २८ कोटी २७ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली़ निविदा प्रक्रिया राबवून ६ जानेवारी २०१७ रोजी या कामांचे कार्यारंभ आदेशही काढण्यात आले़ १८ महिन्यांच्या काळात ही कामे पूर्ण करण्याचे बंधन कंत्राटदारांना घातले होते़
या योजनेंतर्गत नवीन वितरण रोहित्र बसविणे, फिडर बे, एसडीटी, ११ केव्ही उपकेंद्रांची वाहिनी उभारणे, नवीन लघुदाब वाहिनी उभारणे, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना वीज जोडणी देणे आदी कामांना मंजुरी दिली होती़
कंत्राटदारास उद्दिष्टही ठरवून देण्यात आले़ मात्र ही कामे अतिशय संथगतीने जिल्ह्यात केली जात आहेत़ कंत्राटदारांना घालून दिलेली मुदत संपत आली तरी कामे मात्र पूर्ण झाली नाहीत़ स्थानिक महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडूनही कामांचा पाठपुरावा केला जात नाही़ परिणामी २८ कोटी रुपयांची कामे मंजूर होवूनही ती पूर्ण झाली नाहीत़ त्यामुळे जिल्ह्यातील वीज वितरणाच्या समस्या जैसे थे आहेत़
दोन कामे : लागेना मुहूर्त
दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत २८ कोटी रुपयांची ही कामे मे़ विना इलेक्ट्रीकल प्रा़ लि़ अंबाजोगाई आणि मे़ श्रवण इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर नांदेड या दोन कंत्राटदारामार्फत केली जात आहेत़ दोन्ही कंत्राटदारांना कामांचे उद्दिष्ट देण्यात आले़ विना इलेक्ट्रीकल या कंत्राटदारास जिल्ह्यात ३ फिडरबे बसविण्याचे उद्दिष्ट दिले होते़ तर ६ एसडीटी बसविण्याचे उद्दिष्ट दिले होते़ तसेच श्रवण इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर नांदेड यांना ५ फिडरबे आणि ७ एसडीटी बसविण्याचे उद्दिष्ट दिले होते़ त्यापैकी श्रवण इलेक्ट्रीकलने केवळ फिडरबे बसविले आहे तर उर्वरित कामांना दोघांनीही सुरुवातच केली नाही़
ही कामे ठप्प
विना इलेक्ट्रीकल या कंत्राटदाराला ३९ नवीन वितरण रोहित्र बसविण्याचे उद्दिष्ट दिले होते़ त्यापैकी केवळ ४ रोहित्र बसविण्यात आले आहेत़ ११४़७८ किमी ११ केव्ही वाहिनी टाकण्याचे उद्दिष्ट दिले होते़ प्रत्यक्षात केवळ ३१ केव्ही वाहिनी टाकण्यात आली आहे़ तर नवीन लघुदाब वाहिनीसाठी २३़७ किमीचे उद्दिष्ट दिले असताना केवळ ९़५ किमीचेच काम झाले आहे़ ७ हजार ६३७ दारिद्रय रेषेखालील ग्राहकांना वीज जोडणी देण्याचे उद्दिष्ट दिले होते़ मात्र कंत्राटदाराने केवळ ५५० ग्राहकांनाच वीज जोडणी दिली आहे़ तर नांदेडच्या श्रवण इलेक्ट्रीकल या कंत्राटदारानेही उद्दिष्टाप्रमाणे काम केले नाही़ श्रवण इलेक्ट्रीकलला मे महिन्यापर्यंत ४० नवीन वितरण रोहित्र बसविण्याचे उद्दिष्ट दिले होते; परंतु केवळ ८ रोहित्र बसविले आहेत़ तर १३० किमी ११ केव्ही वाहिनीपैकी ५४़५ किमीची वाहिनी टाकली आहे़ नवीन लघुदाब वाहिनीचे २० किमीचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात केवळ ३ किमीचेच काम झाले आहे़ तर दारिद्रय रेषेखालील ग्राहकांना वीज जोडणी देण्यासाठी श्रवण इलेक्ट्रीकलला ५ हजार ६०० ग्राहकांचे उद्दिष्ट दिले होते़ या कंत्राटदाराने केवळ ६५ ग्राहकांनाच आतापर्यंत जोडणी दिली आहे़

Web Title: Parbhani: 28 crore works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.