परभणी : नरेगामध्ये वाढली २८ कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:24 AM2018-11-28T00:24:08+5:302018-11-28T00:24:31+5:30
:महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करावयाच्या कामांमध्ये आणखी २८ कामांचा समावेश करण्यात आल्याने या योजनेंतर्गत कामांची व्याप्ती वाढून जिल्ह्यातील मजुरांना त्याचा फायदा होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी :महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करावयाच्या कामांमध्ये आणखी २८ कामांचा समावेश करण्यात आल्याने या योजनेंतर्गत कामांची व्याप्ती वाढून जिल्ह्यातील मजुरांना त्याचा फायदा होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नियोजन (रोहयो) विभागाने या संदर्भात ५ नोव्हेंबर रोजी अद्यादेश काढला आहे. राज्यातील विविध यंत्रणामार्फत सुरु असलेल्या कामांचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेशी अभिसरण करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार इतर विभागांच्या योजनांशी अभिसरणाद्वारे गुणवत्ता व उत्पादकता वाढीस मदत होणार आहे. या धोरणानुसार राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत इतर विभागांबरोबर सांगड घालून कामे घेण्याच्या आराखड्यास शासनाने मंजुरी दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्हास्तरीय योजनेमध्ये या योजनांचे अभिसरण केल्यास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील निधीही अधिक प्रमाणात वापरात येणार आहे. या निर्णयानुसार शासनाने विविध विभागांमध्ये २८ प्रकारची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे.
परभणी जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या कामांवर मजूर फिरकत नाहीत. परिणामी कामे उपलब्ध असताना मजुरांची संख्या मात्र कमी आहे. नव्या स्वरुपाची कामे या योजनेंतर्गत समाविष्ट झाल्याने मजुरांच्या हाताला काम उपलब्ध होईल. कामाच्या शोधात मजूर मंडळी जिल्ह्याबाहेर स्थलांतरित होत आहे. काही मजूर ग्रामीण भागातून शहरी भागात येत आहेत. मनरेगामध्ये २८ प्रकारच्या कामांचा समावेश होऊन त्याची अंमलबजावणी झाली तर ग्रामपातळीवर मजुरांना काम उपलब्ध होईल. शासनाच्या या आदेशानुसार २०१८-१९ च्या आराखड्यातही नव्याने समाविष्ट केलेली कामे घेण्याची मुभा देण्यात आली आहे.
अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती
४शासनाने नव्याने कामांचा अंतर्भाव केल्यानंतर या कामाच्या अंमलबजावणीसाठी व नियंत्रणासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समितीचे गठण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यात जिल्हास्तरावरील समितीमध्ये जिल्हाधिकारी हे समितीचे अध्यक्ष असून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, सहअध्यक्ष तथा उपवनसंरक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असे विविध विभागाचे १४ अधिकारी सदस्य राहणार आहेत. तालुकास्तरीय समितीमध्ये तहसीलदार हे समितीचे अध्यक्ष असून गटविकास अधिकारी सह अध्यक्ष आहेत.
याशिवाय तालुका कृषी अधिकारी, तालुका लागवड अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता असे १० सदस्य या समितीत राहतील.
या कामांचा झाला समावेश
४शासनाच्या या निर्णयानुसार मनरेगाअंतर्गत नवीन २८ कामांचा समावेश झाला असून त्यात शाळा, खेळाच्या मैदानासाठी संरक्षण भिंत बांधणे, छतासह बाजारओटा तयार करणे, शालेय स्वयंपाकगृह निवारा, नाला, मोरी बांधकाम, सार्वजनिक जागेवरील गोदाम, सिमेंट रस्ता, शाळा, खेळाच्या मैदानासाठी साखळी कुंपन, अंगणवाडी बांधकाम, ग्रामपंचायत भवन, सार्वजनिक जागेवरील शेततळे, कॉंक्रिक नाला बांधकाम, भूमिगत बंधारा, बचतगटाच्या जनावरांसाठी सामूहिक ओटे, स्मशानभूमी शेड बांधकाम आदी कामांचा समावेश आहे.