परभणी :खडका बंधाऱ्यातून ४५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:11 AM2019-08-25T00:11:29+5:302019-08-25T00:15:43+5:30

मराठवाड्यात पर्जन्यमान झालेले नसतानाही जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणातून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेल्या पाण्याने सोनपेठ तालुक्यातील खडका धरण भरले.

Parbhani: 3 cusecs of water discharges from rock dams | परभणी :खडका बंधाऱ्यातून ४५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

परभणी :खडका बंधाऱ्यातून ४५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): मराठवाड्यात पर्जन्यमान झालेले नसतानाही जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणातून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेल्या पाण्याने सोनपेठ तालुक्यातील खडका धरण भरले. या धरणातून २४ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजता एक दरवाजा उघडून ४५०० क्युसेकच्या विसर्गाने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. नदीपात्रात एक ते सव्वा मीटर पूर पातळी राहण्याची शक्यता असल्याने नदीकाठावर असलेल्या तालुक्यातील गावांना तहसील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सोनपेठ तालुक्यात गोदावरी नदी पात्रात असलेल्या खडका धरणात जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. शनिवारी सकाळी ८ वाजता खडका धरणाच्या एका दरवाजातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. हे पाणी सकाळी धारासूर, मैराळ सावंगी, गौंडगाव, चिंच टाकळी मार्गे ११ वाजेच्या सुमारास महातपुरी परिसरातील गोदावरी नदीपात्रात धडकले. कोरड्याठाक पडलेल्या नदीच्या पात्रात पाण्याचा खळखळ आवाज सुरू झाला. गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाºयात रात्री ८ वाजेपर्यंत व गंगाखेड शहरात रात्री उशिराने पाण्याचे आगमन होणार आहे.
गोदावरी नदीपात्रात एक ते सव्वा मिटरपर्यंत पाण्याचा प्रवाह दुथडी भरून वाहण्याचा अंदाज असल्याने पूर नियंत्रण कक्ष सक्रीय झाला आहे. तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी, मंडळ अधिकारी यांनी गोदावरी नदीकाठावर असलेल्या धारासूर, मैराळ सावंगी, गौंडगाव, चिंचटाकळी, खळी, महातपुरी, दुस्सलगाव, भांबरवाडी, मुळी, धारखेड, झोला, पिंपरी, मसला, नागठाणा आदी गावांसह गंगाखेड शहरातील तारूमोहल्ला, बरकत नगर, संत जनाबाई मंदिर परिसरात आदी भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, गंगाखेड तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांसह जनावरांना दोन-दोन कि.मी. पाटपीट करावी लागत आहे. यातच जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. हे पाणी मुळी बंधाºयात साठवून ग्रामस्थांची तहान भागेल, अशी अपेक्षा होती; परंतु, पाटबंधारे विभागाने भविष्यातील पाणीप्रश्न विचारात न घेता आपल्या उदासिनतेचे प्रदर्शन दाखविले. त्यामुळे जायकवाडीतून गोदावरी नदीपात्रात दाखल झालेले पाणी सरळ पुढे निघून जाणार आहे.
२ दलघमी पाणीसाठा
सोनपेठ तालुक्यातील खडका धरणातून गोदावरी नदीपात्रात शनिवारी सकाळी सोडण्यात आलेले पाणी १० तासानंतर मुळी निम्न पातळी बंधाºयात दाखल होईल. या बंधाºयात २.२५ दलघमी पाणी साठवण झाल्यानंतर दरवाजे नसल्याने आलेले पाणी पुढे वाहूून जाऊन रात्री उशिराने गंगाखेड शहरात दाखल होईल. खडका धरणात पाण्याची आवक सुरु राहिल्यास शुक्रवारी सोडण्यात आलेल्या पाण्यात २५ आॅगस्ट रोजी १ हजार क्युसेकने वाढ केल्या जाईल, अशी माहिती मासोळी प्रकल्पाचे शाखाधिकारी रामेश्वर उबाळे यांनी ‘लोकमतशी’ बोलताना दिली.
‘मुळी बंधाºयात पाणी आडवा’
सोनपेठ तालुक्यातील खडका धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडल्याने शनिवारी सकाळी ११ वाजेपासून गंगाखेड तालुक्यातील नदीपात्रात पाण्याची खळखळ सुरू झाली आहे. गंगाखेड तालुक्यातील मुळी निम्न पातळी बंधाºयाला दरवाजेच नसल्याने नदीपात्रात आलेले पाणी तसेच पुढे वाहून जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील आगामी पिण्याच्या पाण्याची उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता मुळी बंधाºयात पाटबंधारे विभागाने तात्पुरता उपाययोजना आखावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Web Title: Parbhani: 3 cusecs of water discharges from rock dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.