परभणी : येलदरी प्रकल्पात ३१ टक्के जिवंत पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 12:03 AM2019-10-26T00:03:20+5:302019-10-26T00:03:43+5:30
जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून सध्या या प्रकल्पात ३१.३० टक्के पाणीसाठा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून सध्या या प्रकल्पात ३१.३० टक्के पाणीसाठा झाला आहे.
येलदरी प्रकल्प दोन वर्षापासून मृतसाठ्यात गेल्याने जिंतूरसह परभणी, पूर्णा, हिंगोली, वसमत आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. जिल्ह्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प असून यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने संपूर्ण पावसाळा संपत आला तरी प्रकल्पात पाणी साठा झाला नव्हता. त्यामुळे जिल्हावासियांमध्ये चिंतेचे वातावरण होते. महिनाभरापूर्वी पूर्णा नदीवर बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने हा प्रकल्प पाण्याने १०० टक्के भरला असून या प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग येलदरी प्रकल्पात येत आहे.
मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात परतीचा पाऊस होत आहे. विशेष म्हणजे सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून खडकपूरा प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या कन्नड, सोयगाव, सिल्लोड, जाफराबाद, बुलढाणा, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार आदी भागात पाऊस होत आहे. या पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्पात दाखल होत असलेले पाणी पूर्णा नदी पात्रात सोडले जात आहे. २३ आॅक्टोबर रोजी या प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडले.
५८ हजार ४०० क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला होता. २४ आॅक्टोबर रोजी हे पाणी येलदरी प्रकल्पामध्ये दाखल झाल्याने त्यामुळे या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. बुधवारी येलदरी प्रकल्पामध्ये १६ टक्के जिवंत पाणीसाठा होता.
गुरुवारी हा पाणीसाठा २२.३० टक्यावर गेला होता. तर शुक्रवारी त्यात आणखी वाढ होत ३१.३० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यासाठी ही समाधानाची बाब ठरत आहे. यामुळे परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील मुख्य शहरांसह २३० हून अधिक खेडे, वाड्या, तांड्यांची वर्षभराची तहान भागणार आहे. विशेष म्हणजे या धरणावर अवलंबून असलेल्या तिन्ही जिल्ह्यातील सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा सिंचनाचा प्रश्नही मिटणार आहे.
येलदरी प्रकल्पात : २५६ दलघमी पाणी
४९३४ दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या या प्रकल्पामध्ये ३८१.०८८ दलघमी पाणीसाठा झाला असून त्यामध्ये २५६.२०० दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ३१.३० टक्के एवढी होते.
४२५ आॅक्टोबर रोजी येलदरी पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला. त्यामुळे या प्रकल्पात अजूनही पाण्याची आवक सुरू आहे. मागील २४ तासात प्रकल्पामध्ये ७० दलघमी पाण्याची आवक झाली आहे.
४प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून आतापर्यंत ९१४ मि.मी. पाऊस झाला आहे. तर १ जूनपासून २६१ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प मृतसाठ्याबाहेर पडला. त्याचा फायदा जिल्हावासियांना होत आहे.