परभणी : ८० हजार हेक्टरवरील खरिपाची पिके बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:36 AM2019-11-18T00:36:29+5:302019-11-18T00:37:58+5:30
तालुक्यातील ११० गावांमधील ८० हजार ५५० हेक्टर क्षेत्रावरील कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या पिकांसाठी नुकसान भरपाईची मागणी प्रशासनाने नोंदविली आहे. प्रशासनाने शनिवारी नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केल्याने येथील शेतकऱ्यांना आता प्रत्यक्ष भरपाई मिळण्याची प्रतीक्षा लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यातील ११० गावांमधील ८० हजार ५५० हेक्टर क्षेत्रावरील कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या पिकांसाठी नुकसान भरपाईची मागणी प्रशासनाने नोंदविली आहे. प्रशासनाने शनिवारी नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केल्याने येथील शेतकऱ्यांना आता प्रत्यक्ष भरपाई मिळण्याची प्रतीक्षा लागली आहे.
परभणी तालुक्यात खरीप हंगामामध्ये १ लाख १ हजार ३९३ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीलायक क्षेत्र असून त्यापैकी यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये १ लाख २ हजार ६७२ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. परभणी तालुकाही सधन तालुक्यामध्ये मोडतो. या तालुक्यात सिंचनासाठी तलाव, सिंचन प्रकल्पांची सुविधा नसली तरी जायकवाडी आणि निम्न दुधना प्रकल्पाचा कालवा या तालुक्यातून गेला आहे. त्यामुळे पारंपरिक पिकांबरोबरच बागायती पिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यावर्षी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांना प्राधान्य दिले होते. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली. परभणी तालुक्यातही या अतिवृष्टीने खरीप पिकांचे आतोनात नुकसान झाले. सतत पडणारा पाऊस आणि ओढ्या-नाल्याला आलेल्या पुरामुळे हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली.
तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे प्रशासनाने तातडीने हाती घेतले. हे पंचनामे पूर्ण झाले असून, १ लाख २ हजार हेक्टरपैकी तब्बल ८० हजार ५५५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे ही सर्व पिके आता शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरली असून शेतकºयांना प्रत्यक्ष मदतीची प्रतीक्षा लागली आहे.
प्रशासन आता या शेतकºयांना किती तत्परतेने मदत पोहचती करते, याकडे तालुक्यातील शेतकºयांचे लक्ष लागले आहे.
मागणीपेक्षा : वाढीव रक्कम मिळणार
४तालुका प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण केल्यानंतर बाधित क्षेत्राला मागील वर्षीच्या निर्देशानुसार रक्कमेची मागणी नोंदविली होती. प्रशासनाने परभणी तालुक्यासाठी ५५ कोटी ६४ लाख ३९ हजार रुपयांची मागणी विभागीय आयुक्तांकडे नोंदविली आहे. जिरायती पिकांसाठी ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर या प्रमाणे ५३ कोटी ८९ लाख ७५ हजार रुपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे.
४शनिवारी प्रशासनाने जिरायती पिकांना प्रति हेक्टरी ८ हजार रुपये मदत जाहीर केली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत अधिक रक्कम प्रशासनाला प्राप्त होणार आहे. बागायती पिकांसाठी १३ हजार ५०० रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे १ कोटी ७२ लाख १२ हजार रुपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे.
४तर फळ पिकांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टरी या प्रमाणे २ कोटी ५२ लाखांची मागणी नोंदविण्यात आली आहे. बागायती पिकांसाठी प्रति हेक्टरी १८ हजार रुपये मदत प्रशासनाने जाहीर केली आहे. त्यामुळे बागायतदार शेतकºयांनाही वाढीव रक्कम मिळण्याची आशा लागली आहे.
८२ हजार शेतकरी मदतीस पात्र
४परभणी तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांचे जवळपास १०० टक्के नुकसान झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार ८२ हजार २०९ शेतकºयांच्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याने या शेतकºयांना आता मदतीची प्रतीक्षा लागली आहे.
रबीच्या पेरण्या रखडल्या
४खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यातच पावसाने हाहाकार माजविला. त्यामुळे ज्या पिकांवर शेतकºयांचा भरोसा होता. ही पिके अतिवृष्टीच्या कचाट्यात सापडली. आता शेतकºयांच्या हातात पैसा नाही. खरीप हंगामातच कर्ज काढून आणि हातउसने पैसे घेऊन पेरण्या केल्या होत्या. हे पैसे कसे फेडायचे, ही चिंता तर शेतकºयांना आहेच. शिवाय रबीच्या पेरण्यांसाठी पैसा कोठून आणायचा, याची चिंता लागली आहे. त्यामुळे पावसाने उघडीप दिली असतानाही रबीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. प्रशासनाकडून मदतीचे वाटप सुरु झाल्यानंतरच पेरण्यांना वेग येईल, असे दिसते.