परभणी : २३ हजार हेक्टर जमीन जिल्ह्यात सिंचनाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:35 PM2019-08-30T23:35:43+5:302019-08-30T23:36:07+5:30
जिल्ह्यातील ५८२ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले असून त्यावर ९६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या माध्यमातून २३ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील ५८२ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले असून त्यावर ९६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या माध्यमातून २३ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
परभणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, परभणी जिल्ह्यात कर्जमाफी, पीक विमा आदींच्या माध्यमातून १ हजार १८२ कोटी रुपयांची मदत वाटप करण्यात आली आहे. पंतप्रधान सिंचाई योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पाला २ हजार १४१ कोटी रुपये देण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यातील रस्त्यांसाठी २ हजार ३५८ कोटी रुपये देण्यात आले असून या अंतर्गत रस्त्यांची कामे सुरु आहेत. जिल्ह्यातील ४० हजार रुग्णांना ९७ कोटी रुपयांच्या आरोग्य सेवेचा लाभ दिला आहे. तसेच सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत जिल्ह्यात १२ हजार घरे पूर्ण झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मराठवाड्याच्या हक्काचे १०२ टीएमसी पाणी आहे. प्रत्यक्षात त्यातील ७० ते ७५ टीएमसी पाण्याचाच वापर होतो. बरेच पाणी वाहून जाते. या विभागात १०२ टीएमसीची धरणे तयार झाली आहेत. त्यामुळे नवीन धरण बांधण्यास मराठवाड्यात बंदी आहे. त्यामुळे मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी विभागातील आठही जिल्हे वॉटर ग्रीडच्या माध्यमातून जोडले जाणार असून तीन जिल्ह्यांमधील कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. उर्वरित जिल्ह्याच्या निविदा लवकरच काढल्या जाणार आहेत. पाच वर्षात राज्य शासनाने केलेल्या कामांची माहिती जनतेला देण्यासाठी महाजनादेश यात्रा काढली आहे. या यात्रेने २१ हजार कि.मी.अंतर पूर्ण केले असून ७३ विधानसभा मतदारसंघात ही यात्रा पोहोचली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पत्रकार परिषदेस आ.सुरजितसिंग ठाकूर, भाजपा महानगर अध्यक्ष आनंद भरोसे, प्रवक्ते केशव उपाध्ये, शिरीष बोराळकर, आ.मोहन फड, अभय चाटे आदींची उपस्थिती होती.
धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते असताना सभागृहात का बोलले नाहीत ?
४राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रे अंतर्गत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य मंत्रिमंडळातील २२ मंत्र्यांनी ९० हजार रुपये कोटींचे घोटाळे केले असल्याचा आरोप जिंतूरच्या सभेत केला होता.
४याबाबतचे पुरावे आपल्याकडे असून एका स्टेजवर या, असे मुख्यमंत्र्यांना त्यांनी आव्हान दिले होते. या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेते आहेत.
४ते सभागृहामध्ये याबाबत का बोलले नाहीत? त्यांच्याकडे एकही पुरावा नाही. त्यांचे सर्व आरोप हवेत आहेत. त्यांच्या आरोपांना आम्ही यापूर्वीच उत्तर दिले आहे. तरीही उत्तर देण्यासाठी स्टेज त्यांनीच ठरावावा, दिवस त्यांची ठरवावा, तेथे मी येण्याची आवश्यकता नाही. सुरेश धस यांना मी तेथे पाठवितो. तेच यावर उत्तर देतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.