परभणी : ३२ कोटींचा निधी शासनाला समर्पित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:21 AM2018-04-03T00:21:16+5:302018-04-03T00:21:16+5:30
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीटीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करीत ५८ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. मात्र प्रत्यक्षात नुकसानीचा आकडा कमी असल्याने शिल्लक राहिलेले ३२ कोटी २४ लाख रुपये शासनाला समर्पित करण्यात आले आहेत.
प्रसाद आर्वीकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीटीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करीत ५८ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. मात्र प्रत्यक्षात नुकसानीचा आकडा कमी असल्याने शिल्लक राहिलेले ३२ कोटी २४ लाख रुपये शासनाला समर्पित करण्यात आले आहेत.
११, १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. यात गहू, ज्वारी या हंगामी पिकांबरोबरच फळबागांचेही नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी चांगलाच संकटात सापडला होता. अशा संकटग्रस्त शेतकºयांना तातडीने मदत करता यावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने दुसºयाच दिवशी पंचनामे केले. यात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सेलू, सोनपेठ, गंगाखेड, जिंतूर, पूर्णा आणि पालम या सहा तालुक्यात गारपीटीमुळे ६६ हजार ८८३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त करीत नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी ५८ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी विभागीय आयुक्तांकडे नोंदविली होती.
त्यानुसार जिल्हा प्रशासनाला ही रक्कम प्राप्त झाली. मदतीचे वाटप करताना नुकसानग्रस्त शेतकºयांच्या प्रत्यक्ष नुकसानीचा आकडा काढून मदत वाटप करण्यात आली. जिंतूर तालुक्यात गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी प्रशासनाला १ कोटी १३ लाख ८८ हजार रुपये प्राप्त झाले होते. २९ मार्चपर्यंत ३५५४ शेतकºयांना ही संपूर्ण रक्कम गारपीट नुकसानीपोटी वितरित करण्यात आली. सेलू तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी १० कोटी ६ लाख २२ हजार रुपयांची रक्कम प्राप्त झाली होती. तालुक्यातील २७ हजार ३९९ शेतकºयांचे गारपीटीने नुकसान झाले होते. या शेतकºयांना ७ कोटी २ लाख ८१ हजार रुपये, सोनपेठ तालुक्यासाठी १ कोटी ८४ लाख ९ हजार रुपये प्राप्त झाले. त्यातून २३४ शेतकºयांना २६ लाख ४ हजार रुपये, गंगाखेड तालुक्यासाठी १३ कोटी ७६ लाख ९० हजार रुपये प्राप्त झाले होते. प्रत्यक्षात ४ हजार ७६९ शेतकºयांना २ कोटी २५ लाख ९३ हजार रुपये मदत वाटप करण्यात आली. पालम तालुक्यास गारपीट नुकसानीच्या मदतीसाठी २१ कोटी ८२ लाख ४० हजार रुपये प्राप्त झाले होते. त्यातून १७१४१ शेतकºयांना ७ कोटी ८२ लाख ४४ हजार रुपये आणि पूर्णा तालुक्यासाठी प्राप्त झालेल्या ९ कोटी ६९ लाख १ हजार रुपयांच्या रकमेतून ११ हजार १५७ शेतकºयांना ७ कोटी ५६ लाख ५८ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.
गारपीट नुकसानीसाठी तातडीने मदत मागविणे आवश्यक असल्याने जिल्हा प्रशासनाने अंदाजित पंचनामे करीत मदत निधीची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात मदत वाटप करीत असताना नुकसानीचा आकडा कमी असल्याने २६ कोटी ७ लाख ६८ हजार रुपयांची मदत ६४ हजार २५४ शेतकºयांना वाटप करण्यात आली. उपलब्ध रक्कमेपैकी ३२ कोटी २४ लाख ८२ हजार रुपयांची रक्कम शिल्लक राहिल्याने ती शासनाला समर्पित करण्यात आली.
पालम तालुक्यात सर्वाधिक नुकसान
११, १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यामध्ये गारपीट झाली होती. या गारपीटीत पालम तालुक्यामध्ये २४ हजार ९२८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ५० टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले होते. त्यामुळे गारपीटग्रस्तांच्या मदतीसाठी २१ कोटी ८२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तालुका प्रशासनाने १७ हजार १४१ शेतकºयांना ७ कोटी ८२ लाख ४४ हजार रुपयांची मदत वाटप केली आहे. तसेच सेलू तालुक्यामध्ये ६२५ हेक्टरवरील पिकांचे ५० टक्केपेक्षा अधिक तर ११ हजार ४४१ हेक्टरवरील पिकांचे ३३ ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले होते. या तालुक्यासाठी १० कोटी ६ लाख २२ हजार रुपये मदत मागविण्यात आली. प्रत्यक्षात २७ हजार ३९९ शेतकºयांना ७ कोटी २ लाख ८१ हजार रुपये मदतीचे वाटप करण्यात आले. सोनपेठ तालुक्यात २६ लाख ४ हजार, गंगाखेड २ कोटी २५ लाख ९३ हजार तर पूर्णा तालुक्यात ७ कोटी ५६ लाख ५८ हजार रुपयांची मदत गारपीटग्रस्तांना वाटप करण्यात आली आहे.
पाच तालुक्यात शिल्लक राहिला निधी
जिल्ह्यात सहा तालुक्यांमध्ये गारपीट झाली होती. या गारपीटीची पंचनामे केल्यानंतर सहाही तालुक्यातील गारपीट ग्रस्तांसाठी मदतीची मागणी करण्यात आली. त्यात केवळ जिंतूर तालुक्यात १०० टक्के मदतनिधी वाटप झाला असून सेलू तालुक्यात ३ कोटी ३ लाख ४१ हजार रुपये, सोनपेठ तालुक्यात १ कोटी ५८ लाख ५ हजार रुपये, गंगाखेड ११ कोटी ५० लाख ९७ हजार, पालम तालुक्यातून १३ कोटी ९९ लाख ९६ हजार तर पूर्णा तालुक्यातून २ कोटी १२ लाख ४३ हजार रुपयांचा निधी शिल्लक राहिल्याने तो शासन दफ्तरी समर्पित करण्यात आला आहे.