परभणी : ३८ दिवसांत पेट्रोल ८.२६ रुपयांनी घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:04 AM2018-11-13T00:04:49+5:302018-11-13T00:05:23+5:30
देशात सर्वाधिक किंमतीमध्ये इंधन खरेदीचा परभणीकरांचा उच्चांक कायम असला तरी गेल्या ३८ दिवसांमध्ये तब्बल ८ रुपये २६ पैसे प्रति लिटर पेट्रोलच्या किंमतीमध्ये कपात झाल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : देशात सर्वाधिक किंमतीमध्ये इंधन खरेदीचा परभणीकरांचा उच्चांक कायम असला तरी गेल्या ३८ दिवसांमध्ये तब्बल ८ रुपये २६ पैसे प्रति लिटर पेट्रोलच्या किंमतीमध्ये कपात झाल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे.
मनमाड येथील तेल डेपोपासून इंधनाची वाहतूक करण्यास अधिक भाडे लागत असल्याच्या कारणावरुन इतर शहरांच्या तुलनेत देशात सर्वाधिक महाग पेट्रोल परभणीमध्ये मिळत आहे. सप्टेंबर व आॅक्टोबर या दोन महिन्यांमध्ये पेट्रोल दरवाढ सातत्याने होत असल्याने सर्वाधिक रक्कम देऊन पेट्रोल खरेदी केले जात असल्याची जाणीव परभणीकरांना झाली. त्यानंतर देशपातळीवर परभणीचे नाव पोहचले. आजही परभणीकर सर्वाधिक दरानेच पेट्रोल खरेदी करीत आहेत. असे असले तरी आंतराष्ट्रीय पातळीवर गेल्या २२ दिवसांपासून इंधनाच्या दरामध्ये घसरण होत असल्याने देशातील इंधन दरामध्ये सातत्याने कपात होत आहे. परिणामी परभणीतही इंधनाचे दर कमी झाले आहेत. परभणीत ४ आॅक्टोबर रोजी सर्वाधिक म्हणजे तब्बल ९३.३७ पैसे प्रति लिटर दराने परभणीकरांना पेट्रोल तर ८०.८२ पैसे प्रति लिटर दराने डिझेल खरेदी करावे लागले.
१२ नोव्हेंबर रोजी मात्र आॅक्टोबरच्या तुलनेत तब्बल ८ रुपये २६ पैसे कमी दराने म्हणजेच ८५ रुपये ११ पैसे प्रति लिटर पेट्रोल मिळाले. तर डिझेल ४ रुपये २८ पैसे कमी दराने म्हणजेच ७६ रुपये ५४ पैसे कमी दराने मिळाले.
४ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत पेट्रोलच्या दरात ८ रुपये ४० पैसे प्रति लिटर दराने कपात झाली. तर १ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत १ रुपया ४८ पैसे प्रति लिटर दराने कपात झाली. डिझेलमध्येही ४ ते ३१ आॅक्टोबर कालावधीत प्रति लिटर ३ रुपये ६ पैसे घट झाली. तर १ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत ४ रुपये २८ पैसे प्रति लिटर दराने कपात झाली. आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडीचा पेट्रोल, डिझेल किंमतीवर परिणाम होत असला तरी इंधन दरवाढीमुळे केलेली भाडेवाढ मात्र वाहतूकदार व प्रवासी वाहनमालकांनी कमी केलेली नाही. उलट काहींनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अधिकची भाडेवाढ केली आहे. याचा सर्वसामान्यांना फटका बसत असताना याकडे गांभीर्याने पाहण्यास कोणीही तयार नाही. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना इंधन दर कपात होऊनही महागाईचा फटका सहन करावा लागत आहे.
कच्च्या तेलात २० टक्के घसरण; पण दर मात्र ७ टक्केच कपात
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात जवळपास २० टक्के घसरण झाली आहे. त्यामुळेच इंधनाचे दर कमी होत असल्याचे समजते. ३ आॅक्टोबर रोजी आंतराष्ट्रीयस्तरावर ब्रेंट क्रुड ८४.७४ डॉलर प्रति बॅरेल होते, ते ९ नोव्हेंबर रोजी ६९.७० डॉलर प्रति बॅरल झाले. डब्ल्यूटीआय क्रुड देखील २० टक्क्यांनी कमी होऊन ६५.६० डॉलर प्रति बॅरल झाले. कच्च्या तेलात जवळपास २० टक्के कपात होत असताना तेल कंपन्यांकडून मात्र नागरिकांना त्याचा पुरेपुर लाभ होऊ दिला जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. कच्च्या तेलाचे दर २० टक्क्याने कमी झाले असताना इंधनाचे दर मात्र फक्त ७ टक्क्यांनी कमी केले जात आहेत. परिणामी तेल कंपन्यांचा ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारणे सुरुच आहे.
एकीकडे इंधन दरवाढीने सर्वसामान्य नागरिक हैराण असताना नागरिकांना मिळणारे इंधन अचूक व शुद्ध आहे की नाही, याची पडताळणी करणारी सक्षम यंत्रणाच जिल्हापातळीवर कार्यरत नाही. परभणीत इंधनात भेसळ होत असल्याच्या तक्रारी सातत्याने जिल्हा पुरवठा विभागाकडे करण्यात आल्या होत्या; परंतु, या तक्रारीवर पुरवठा विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. नियमितपणे जिल्ह्यातील पेट्रोलपंपाची तपासणी होत नाही. शिवाय ग्राहकांनी दिलेल्या पेट्रोलच्या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल महिनोमहिने मिळत नाही. परिणामी सर्वच बाजुंनी ग्राहकांची कोंडी होत असताना तेल कंपन्यांचे अधिकारी आणि पुरवठा विभागाचे अधिकारी मूग गिळून गप्प आहेत.