परभणी : ४ एकर पपई पिकावर फिरविला नांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:40 AM2018-11-24T00:40:52+5:302018-11-24T00:41:54+5:30
दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यात जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिकांसाठी पाणी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील नरवाडी येथील एका शेतकऱ्याने पपई पिकावर नांगर फिरविल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली. पाण्याअभावी नोव्हेंबर महिन्यातच फळबाग उत्पादक अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी): दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यात जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिकांसाठी पाणी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील नरवाडी येथील एका शेतकऱ्याने पपई पिकावर नांगर फिरविल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली. पाण्याअभावी नोव्हेंबर महिन्यातच फळबाग उत्पादक अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील पाणीपातळीत दिवसेंदिवस मोठी घट होत आहे. ज्या शेतकºयांकडे पाणीसाठा उपलब्ध आहे, अशा शेतकºयांनी फळपीक व रबी हंगामातील ज्वारी, गव्हाची पेरणी केली; परंतु, वाढते तापमान व अत्यल्प पावसामुळे नोव्हेंबर महिन्यातच तालुक्यातील भूजलपातळीमध्ये मोठी घट होत आहे. त्याचा फटका शेतकºयांना बसत आहे.
सोनपेठ तालुक्यातील नरवाडी येथे सर्वे ३/४ मध्ये नंदकुमार जोगदंड यांनी आपल्या शेतात उपलब्ध पाण्यावर पपई फळाची लागवड केली; परंतु, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जलस्त्रोतांची पाणीपातळी खालावली. पपई पिकाला पाणी देणे जोगदंड यांना शक्य होत नव्हते. त्यामुळे बहरात आलेल्या पपई फळ पिकावर नाविलाजास्तव नांगर फिरवावा लागला. त्यामुळे जोगदंड यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.
सोनपेठ तालुक्यात यापूर्वीही एका शेतकºयाने कापसात जनावरे सोडून दिल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पपई उत्पादकाने बाग मोडल्याने दुष्काळाची दाहकता वाढत असल्याचेच दिसत आहे.