परभणी : पाण्याअभावी करपली ४ लाख रोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:15 AM2018-08-12T00:15:14+5:302018-08-12T00:17:29+5:30
महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये ३० विभागांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबवून ३७ लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले होते; परंतु, वृक्षारोपणानंतर जिल्ह्यात पाऊस न झाल्याने जवळपास ४ लाख रोपे जागेवरच करपल्याचे पहावयास मिळाली.
मारोती जुंबडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये ३० विभागांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबवून ३७ लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले होते; परंतु, वृक्षारोपणानंतर जिल्ह्यात पाऊस न झाल्याने जवळपास ४ लाख रोपे जागेवरच करपल्याचे पहावयास मिळाली.
जिल्ह्यामध्ये सलग तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावर नामी उपाय म्हणून वनविभागाने मागील दोन वर्षापासून जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहीम सुरु केली. या अंतर्गत २०१६ या वर्षी जिल्ह्यात २ लाख ८४ हजार ४८० वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यानंतर २०१७ मध्ये ७ लाख २२ हजार वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यानंतर एकाही विभागाने वृक्ष जोपासणीकडे लक्ष दिले नाही.
त्यामुळे जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचा पूरता बोजवारा उडाल्याचे दिसून आले. वनविभागाच्या आकडेवारीनुसार २०१६ मध्ये करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीतून ६२.६३ टक्के तर २०१७ मध्ये ६३.५८ टक्के झाडे जगल्याचा अहवाल आहे. मात्र प्रत्यक्षात वनविभागाने काढलेल्या टक्केवारी एवढीही झाडे जिल्ह्यात जगली नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून दिसून आले. राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत २०१८ या वर्षासाठी परभणी जिल्ह्याला ३४ लाख १६ हजार वृक्षरोपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
यामध्ये महसूल विभागाला २८ हजार, पशूसंवर्धन विभाग २५ हजार ८००, नगरविकास विभाग १ लाख २९ हजार ८००, उद्योग विभाग ६४ हजार, गृह विभाग ११ हजार ५००, कारागृह ३ हजार, सार्वजनिक आरोग्य सेवा ८९ हजार ५००, सार्वजनिक बांधकाम विभाग १८ हजार, ग्रामविकास विभाग ८ लाख १४ हजार ६४, कृषी विभाग २ लाख ४९ हजार १००, वनविभाग ६ लाख २४ हजार, सामाजिक वनीकरण विभाग ५ लाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ १ लाख, केंद्रीय रेल्वे विभाग ४५ हजार, कौशल्य विकास उद्योजकता ९ हजार, जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींना या वृक्षलागवडी योजनेंतर्गत ७ लाख ६८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या ३० विभागांपैकी केंद्रीय रेल्वे विभागाने वृक्ष लागवड केली नाही. उर्वरित २९ विभागाने जिल्ह्याला दिलेले ३४ लाख १६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करुन २ लाख रोपटे अधिकचे लावण्यात आले.
वृक्ष लागवड मोहिमेत एक पाऊल पुढे घेऊन सर्व विभागांनी मोहीम यशस्वी केली; परंतु, वृक्षरोपणानंतर जिल्ह्यात एकही पाऊस झाला नाही.
परिणामी लावण्यात आलेल्या रोपट्यांना पाणीच मिळाले नाही. त्यामुळे परभणी तालुक्यातील उजळंबा रस्ता, आर्वी ते कुंभारी, एस.टी. महामंडळ आदी ठिकाणी लावण्यात आलेले रोपे जागेवरच करपली आहेत. त्या अनुषंगाने केलेल्या पाहणीतून जिल्ह्यातील ४ लाख रोपटे पाण्याअभावी जागेवरच करपून गेल्याचे केलेल्या आढळून आले. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात राबविलेली वृक्ष लागवड मोहिमेचा पावसाळा संपण्यापूर्वीच फज्जा उडाला असल्याचे दिसत आहे.