परभणी : मानवतमध्ये हॉटेलसह ४ दुकाने खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:54 AM2019-01-29T00:54:38+5:302019-01-29T00:54:49+5:30
शहरातील आठवडे बाजार परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एका हॉटेलसह अन्य चार दुकाने जळून खाक झाली. हॉटेल मालक किरकोळ जखमी झाला असून यामध्ये जिवित हानी झाली नाही. या घटनेमुळे जवळपास ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना २८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी) : शहरातील आठवडे बाजार परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एका हॉटेलसह अन्य चार दुकाने जळून खाक झाली. हॉटेल मालक किरकोळ जखमी झाला असून यामध्ये जिवित हानी झाली नाही. या घटनेमुळे जवळपास ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना २८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
शहरातील आठवडे बाजार परिसरात असलेल्या शिवशंकर हॉटेलमधील गॅस सिलेंडरने पेट घेतल्याने सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे हॉटेलला आग लागून जळून खाक झाले. त्याच बरोबर बाजूच्या दुकानातंही आग लागल्याने हॉटेलच्या बाजुच्या एका मोबाईल शॉपी, टेलरच्या दुकानानेही पेट घेतला. या घटनेत चार दुकाने जळून खाक झाली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या अग्नीशामक दलासह पाथरीहून अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले. सकाळी १० वाजता आगीवर नियंत्रण मिळवित आग विझविण्यात आली. सोमवार हा बाजाराचा दिवस होता, मात्र आग सकाळी लागल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेत हॉटेलमालक भास्कर काळे यांचे हात भाजल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे, डॉ. अंकूश लाड, अनंंत भदर्गे, यश कत्रुवार, अनंत गोलाईत, बालाजी दहे, सपोनि प्रवीण दिनकर यांनी घटनास्थळी भेट दिली. तहसीलदार डी.डी. फुफाटे यांनी घटनास्थळी भेट दिली. मंडळ अधिकारी सुरवसे यांनी झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला.