परभणी : सात महिन्यांत ४ हजार जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 12:16 AM2018-08-04T00:16:39+5:302018-08-04T00:17:37+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी व रक्त विघटन केंद्राकडे जानेवारी ते जुलै या सात महिन्यात ४ हजार ३५६ जणांनी रक्तदान केले आहे. त्यामुळे रक्तपेढी व रक्त विघटन केंद्रांकडून रुग्णांना रक्त पिशव्यांचे वितरण करताना सोयीचे झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी व रक्त विघटन केंद्राकडे जानेवारी ते जुलै या सात महिन्यात ४ हजार ३५६ जणांनी रक्तदान केले आहे. त्यामुळे रक्तपेढी व रक्त विघटन केंद्रांकडून रुग्णांना रक्त पिशव्यांचे वितरण करताना सोयीचे झाले आहे.
शस्त्रक्रिया, बाळांतपणातील अति रक्तस्त्राव, अपघातात जखमी झालेले रुग्ण, हिमोफिलिया, थॅलेसेमिया आदींना रक्ताची नितांत आवश्यकता असते. या रुग्णांना रक्त देण्यासाठी नातेवाईक रक्तपेढीकडे धाव घेतात; परंतु, काही वेळेस या रुग्णांना रक्त पिशव्यांच्या तुटवड्यामुळे रक्त मिळू शकत नाही. परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय रक्तपेढी आहे. या रक्तपेढीतून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात रक्त पिशव्यांचा पुरवठा केला जातो. याच बरोबर जीवनअमृत सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातील रुग्णांनाही लाभ दिला जातो. त्यामुळे ज्या रुग्णांना रक्ताची गरज भासते, त्या सर्व रुग्णांचा भार या रक्तपेढीवर असतो. जानेवारी ते जुलै या सात महिन्यात रक्तपेढी व रक्त विघटन केंद्राकडून जिल्ह्यात वेगवेगळ्या ८२ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरातून ३ हजार ९९ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. त्याच बरोबर जिल्ह्यातील १ हजार २५७ इच्छुक रक्तदात्यांनी रक्तपेढीमध्ये जावून रक्तदान केले. अशा ४ हजार ३५६ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. यामध्ये ३ हजार ४९८ रुग्णांना रक्त पिशव्यांचे वाटप करण्यात आले. ९६१ रुग्णांना रक्तघटक देण्यात आले. ११२ थॅलेसेमिया रुग्णांना ५१२ रक्ताचा पुरवठा करण्यात आला. तर जीवनअमृत सेवाअंतर्गत जिल्ह्यातील २५ रुग्णालयात ५९६ रुग्णांना सेवा देण्यात आली.