परभणी : ४० हजार मजुरांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:11 AM2019-04-15T00:11:24+5:302019-04-15T00:12:17+5:30

तालुक्यातील ग्रामीण भागातून कामाच्या शोधासाठी ४० हजारांहून अधिक मजुरांनी स्थलांतर केले आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ग्रामीण भागात कामासाठी मजुरांना भटकंती करावी लागत असल्याचे चित्र जिंतूर तालुक्यात पहावयास मिळत आहे.

Parbhani: 40,000 migration of laborers | परभणी : ४० हजार मजुरांचे स्थलांतर

परभणी : ४० हजार मजुरांचे स्थलांतर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): तालुक्यातील ग्रामीण भागातून कामाच्या शोधासाठी ४० हजारांहून अधिक मजुरांनी स्थलांतर केले आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ग्रामीण भागात कामासाठी मजुरांना भटकंती करावी लागत असल्याचे चित्र जिंतूर तालुक्यात पहावयास मिळत आहे.
तालुक्यामध्ये रोजगाराच्या कोणत्याच सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. कमी पाऊस, शेतीची नापिकी यामुळे शेतामध्ये काम नाही. प्रशासनाच्या वतीने रोजगार हमी योजनेची अनेक कामे सुरु असतात; परंतु, मागील तीन वर्षापासून रोजगार हमी योजनेची कामे बंद आहेत. परिणामी मजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी कामाच्या शोधासाठी भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील अनेक गावे ओस पडली आहेत. तालुक्यातील वझर, सावंगी म्हाळसा, वाघी धानोरा हा डोंगरपट्टा आहे. या भागांमध्ये केवळ खरीप पिके घेतली जातात. यावर्षी तर पाऊस झाला नसल्याने या भागातील मजुरांवर उपासमारीची कुºहाड कोसळली आहे. वझर या गटामध्ये १७ गावे असून कोठा तांडा, कोरवाडी तांडा, हंडी तांडा, असोला तांडा, सावंगी तांडा, बोरगाव वाडी तांडा हे ६ तांडे आहेत. या गटातून साधारण तीन ते साडेतीन हजार मजुरांचे कामासाठी स्थलांतर झाले आहेत. दुसरीकडे सावंगी म्हाळसा या गटात १८ गावांचा समावेश आहे. यामध्ये विजयनगर तांडा, रामनगर तांडा, चव्हाळीक तांडा, अंबरवाडी तांडा, जोगी तांडा, आवलगाव तांडा, संक्राळा या गावातून सर्वाधिक मजूर स्थलांतरित झाले आहेत. साधारणत: ५ ते ६ हजार मजूर कामासाठी बाहेरगावी गेले आहेत. आडगाव बाजार गटात २१ गावे असून या गावातील ४ हजार मजूर स्थलांतरित झाले आहेत. कौसडी गटामध्ये १९ गावांचा समावेश असून यामध्ये मंगरुळ तांडा हा एकमेव तांडा आहे. या गटातून साधारण ३ हजार मजुरांचे स्थलांतर झाले आहे. चारठाणा या गटात १८ गावे असून या गटातून जवळपास तीन ते साडेतीन हजार मजूर स्थलांतरीत झाले आहेत. वाघी धानोरा हा डोंगराळ भाग असून या गटात १४ गावांचा समावेश आहे. यामधून ४ ते ५ हजार मजूर स्थलांतरित झाले आहेत. वरुड गटात १७ गावे असून यामधून साडेतीन हजार मजूर स्थलांतरीत झाले आहेत. वस्सा गटात १४ गावांचा समावेश असून ४ हजार मजूर स्थलांतरित झाले आहेत. बोरी गटातून ३ हजार मजूर कामासाठी स्थलांतरित झाले आहेत. असे एकूण ४० हजार मजूर कामाच्या शोधात तालुक्यातून बाहेर पडले आहेत.
दुसरीकडे जिंतूर तालुक्यात रोजगार हमी योजनेची कोणतीच कामे सुरु नाहीत. प्रशासन एकीकडे हातावरील कामाची संख्या हजारावर दाखवत असताना हजारात एकही काम सुरु नाही. यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळत नाही. विशेष म्हणजे यावर्षी शेतीमध्ये काम करणारे १० ते १५ हजार मजूर बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी या तालुक्यातून सर्वाधिक मजूर औरंगाबाद, आळंदी, नाशिक, पुणे, मुंबई, अहमदनगरकडे स्थलांतरित झाले आहेत. प्रशासन मात्र या स्थलांतरांच्या प्रश्नावर गंभीर नाही. केवळ कागदोपत्री घोडे नाचवून दिवस काढायचा, हा चालढकलपणा प्रशासनाकडून होत असल्याचे चित्र आहे.
ऊसतोड मजूर परतीच्या वाटेवर
४तालुक्यातील जवळपास ५० पेक्षा जास्त तांडे व वाडीवस्तीवरील मजूर ऊसतोडीसाठी बाहेर जात असतो. कारखान्याचा पट्टा पडल्याने त्यांच्या हाताला काम नाही. आता हा मजूर गावाकडे परतत आहे; परंतु, गावामध्ये काम उपलब्ध नसल्याने या मजुरांकडे बेरोजगारीशिवाय पर्याय नाही. प्रशासनाने यावर तातडीने पाऊले उचलणे गरजेचे आहे. त्याच बरोबर तालुक्यातील शेतमजुरांना काम मिळत नाही.
डोंगरपट्टे पडले ओस
४जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा, सावंगी म्हाळसा व वझूर या गटातील काही भाग अतिशय दुर्गम व डोंगरपट्टा आहे. या भागामध्ये मजुरांना काम मिळेल, असे कोणतेही साधन नाही. परिणामी या भागातून स्थलांतरीत होणाऱ्या मजुरांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या भागातील अनेक गावे ओस पडली असून गावामध्ये ज्येष्ठ नागरिक वगळता सर्वजण कामासाठी स्थलांतरीत झाले आहेत.
रोजगार हमीकडे दुर्लक्ष
जिंतूर तालुक्यात मागील तीन ते चार वर्षापासून रोजगार हमी योजनेची कामे बंद आहेत. ही कामे सुरु झाली तर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो; परंतु, अनेक कंत्राटदार हे मशीनद्वारे काम करतात. प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन ही कामे सुरु केली तर मजुरांच्या हाताला काम मिळेल व शहराकडे स्थलांतरीत होणारे मजुरांचे लोंढे थांबतील.

जिंतूर तालुक्यात पंचायत समितीमार्फत सध्या एकही रोजगार हमी योजनेचे काम चालू नाही. त्यातही निवडणूक आचारसंहिता सुरु आहे. विहिरींचे प्रस्ताव आलेले आहेत. मात्र अद्यापपर्यंत एकही काम सुरु नाही.
-शिवराम ढोणे, विस्तार अधिकारी, पं.स. जिंतूर

Web Title: Parbhani: 40,000 migration of laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.