परभणी : शेवटच्या टप्प्यात ४३ टँकरने पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:38 AM2018-06-04T00:38:27+5:302018-06-04T00:38:27+5:30
जिल्हावासियांना पावसाळ्याचे वेध लागले असले तरी पाणीटंचाई दूर झालेली नसून शेवटच्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील सुमारे ४२ हजार १४९ ग्रामस्थांना ४२ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हावासियांना पावसाळ्याचे वेध लागले असले तरी पाणीटंचाई दूर झालेली नसून शेवटच्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील सुमारे ४२ हजार १४९ ग्रामस्थांना ४२ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे.
यावर्षीच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात जलसाठे आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली होती. सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प वगळता इतर सर्वच प्रकल्पांमधील पाणी आटल्याने टंचाईचा प्रश्न निर्माण झाला. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या. त्यात ४२ टँकरने टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामस्थांना सध्या पावसाळ्याचे वेध लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी पाऊस झाला असला तरी भूजल पातळीत थोडीही वाढ झाली नाही. त्यामुळे प्रशासनाने अजूनही टँकर सुरु ठेवले आहेत. सद्यस्थितीत २३ गावे आणि १३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. पालम तालुक्यात सर्वाधिक १५ टँकर सुरु असून दररोज २४ फेऱ्या करुन तालुक्यातील १२ हजार ९४७ ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. गंगाखेड तालुक्यात १० टँकरच्या सहाय्याने १७ हजार २५९ ग्रामस्थांना पाणीपुरवठा होत आहे. तर पूर्णा तालुक्यात ८, सेलू तालुक्यात ४ आणि जिंतूर तालुक्यात ५ टँकरच्या सहाय्याने ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करुन दिले जात आहे.
यावर्षी जिल्ह्यातील बहुतांश भागात जायकवाडी प्रकल्पाचे पाणी उपलब्ध झाल्यामुळे टंचाई जाणवली नाही. मात्र पालम, पूर्णा, जिंतूर या तालुक्यांमध्ये टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारण्यासाठी टँकर बरोबर विहीर अधिग्रहण, तात्पुरती नळ योजना दुरुस्ती, पूरक पाणीपुरवठा योजना आदी उपाययोजना हाती घेतल्या होत्या.
त्याचप्रमाणे नव्याने विंधन विहीर घेण्याची कामेही केली आहेत. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असून मान्सूनचा पाऊस दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ होऊन टंचाई दूर होईल. मात्र मोठा पाऊस होईपर्यंत प्रशासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे.
टँकर सुरु असलेली गावे
पालम तालुका- रामपूर व रामपूर तांडा, नाव्हा, चाटोरी, आनंदवाडी, पेठपिंपळगाव, तांदुळगाव, पेठशिवणी, पेंडू, बोंदरवाडी, कापसी, फुटतलाव तांडा व धनाजी तांडा, पिराचा तांडा, पायरीका तांडा. पूर्णा तालुका- पिंपळगाव लोखंडे, हिवरा, वाई लासीना, लोण खु., गोविंदपूर, आहेरवाडी, गौर, पिंपळा भत्या. गंगाखेड तालुका- खंडाळी, इळेगाव, गुंडेवाडी, उमरा नाईक तांडा, गुंजेगाव, मरडसगाव, लिंबवाडी तांडा, उमाटवाडी, गणेशपुरी, मसनेरवाडी. सेलू तालुका- पिंपळगाव गोसावी, नागठाणा, तळतुंबा, नांदगाव. जिंतूर तालुका- मांडवा, कोरवाडी व कोरवाडी तांडा, वडी, शिवाची वाडी.
२०४ विहिरींचे अधिग्रहण
उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३० मेपर्यंत २०४ विहिरींचे अधिग्रहण करुन या विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी खुले केले. त्यात २८ विहिरी टँकरसाठी अधिग्रहित केल्या. १७६ विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक ६९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिंतूर तालुक्यात ४१, पालम तालुक्यात ३१, पूर्णा २६, सेलू २४, पाथरी ६ आणि मानवत तालुक्यात ४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.