परभणी :गोदावरीतून दररोज ५० ब्रास वाळू लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:32 AM2018-09-14T00:32:42+5:302018-09-14T00:33:18+5:30
तालुक्यातील गौंडगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रातून दररोज रात्रीच्या वेळी ५० ब्रास वाळू चोरी होत असल्याचा प्रकार गेल्या दीड महिन्यापासून सुरू असून, या प्रकरणी महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : तालुक्यातील गौंडगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रातून दररोज रात्रीच्या वेळी ५० ब्रास वाळू चोरी होत असल्याचा प्रकार गेल्या दीड महिन्यापासून सुरू असून, या प्रकरणी महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे़
गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात झोला, पिंपरी झोला, मसला, खळी, गौंडगाव, चिंचटाकळी, मैराळ सावंगी, दुस्सलगाव, भांबरवाडी, महातपुरी, आनंदवाडी, धारखेड, नागठाणा व मुळी आदी गोदावरी नदीपात्राजवळील गावात वाळू उपसासाठीचे वाळूचे घाट आहेत.
आजघडीला तालुक्यातील वरील एकाही वाळू घाटाचा महसूल प्रशासनाकडून लिलाव झालेला नाही. असे असताना सुद्धा गौंडगाव परिसरातील वाळू घाटावरून दररोज रात्री ट्रॅक्टरद्वारे ५० ब्रॉस वाळूचा राजरोसपणे उपसा केला जात आहे. त्यानंतर गोदावरी नदीपात्रातील उपसा केलेली वाळू ट्रॅक्टरच्या माध्यमातून पात्राबाहेर असलेल्या चिंचटाकळी रस्त्याच्या बाजूला साठा करून ठेवली जात आहे. या साठ्यातून हायवा, टिप्पर, ट्रॅक्टर आदी वाहने भरून त्याची विनापरवाना अवैधरित्या वाहतूक केल्या जाते.
गौंडगाव येथील वाळू धक्याचा लिलाव झाला नसताना वाळू उपसा केला जात असल्याने गावातील काही ग्रामस्थांनी या अवैध वाळू उपशाला तीव्र विरोध केला. मात्र वाळूमाफियांकडून ग्रामस्थांना धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे वाळू घाटांचा लिलाव झाला नसतानाही दरदिवशी रात्रीच्या वेळी साडेतीन लाख रुपयांच्या वाळूचा राजरोसपणे विनापरवाना उपसा होत असताना महसूल प्रशासनातील तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रात्रीच्या वाळू उपशाने होतेय झोपमोड
गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना वाळू उपसा करण्यासाठी रात्रभर ट्रॅक्टर, जेसीबी आदी वाहने चालू असल्याने या वाहनांच्या आवाजाचा मोठा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर वाळूची चोरटी वाहतूक करणारी वाहने ही भरधाव वेगात धावत असल्याने रस्त्याने चालताना सुद्धा भीती वाटत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. विशेष म्हणजे रस्त्याच्या बाजूला केलेले वाळू साठे संबधित गावाचे तलाठी, मंडळ अधिकारी व तहसील कार्यालयातील अधिकाºयांच्या निदर्शनास कसे काय, येत नाहीत, अशी प्रतिक्रिया गौंडगाव येथील एका ग्रामस्थाने दिली.
पर्यावरणास धोका
गौंडगाव परिसरातून राजरोसपणे होणाºया वाळू उपशामुळे गोदावरी नदीपात्रातील पाणीपातळी खालावत आहे. त्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील नदीपात्रातून विना परवाना होणाºया वाळू उपशाकडे नूतन तहसीलदार स्वरुप कंकाळ हे लक्ष देऊन अनाधिकृत वाळू उपसा करणाºया वाळू माफियांना रोखतील का? असा सवाल ग्रामस्थांमधूून उपस्थित केला जात आहे.