परभणी : मतदार यादीत ५१ हजार दुबार नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:42 AM2019-02-28T00:42:30+5:302019-02-28T00:42:42+5:30
निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीमध्ये जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात ५१ हजार ९६० मतदारांची नावे दोन वेळा असून, ही नावे मतदार यादीतून वगळावीत, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीमध्ये जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात ५१ हजार ९६० मतदारांची नावे दोन वेळा असून, ही नावे मतदार यादीतून वगळावीत, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़
परभणी जिल्ह्यातील मतदारांची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे़ दोन दिवसांपूर्वी मतदार यादीमधील नावांत काही आक्षेप असतील तर तेही प्रशासनाने दाखल करून घेतले आहेत़ दरम्यान जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले असून, जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात एकाच व्यक्तीचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक नावे असलेले ५१ हजार ९६० मतदार असल्याची गंभीर स्वरुपाची तक्रार केली आहे़ जिंतूर विधानसभा मतदार संघात १३ हजार ९५२ मतदारांची नावे दुबार आहेत़ तसेच परभणी विधानसभा मतदार संघामध्ये ८ हजार ७८०, गंगाखेड विधानसभा मतदार संघात १७ हजार २९५, पाथरी विधानसभा मतदार संघामध्ये १० हजार ५९० मतदारांची नावे एकापेक्षा अधिक वेळा आहेत़ ही बाब गंभीर स्वरुपाची असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनेही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असल्याचे जिल्हा काँगे्रसच्या वतीने प्रशासनाला सांगण्यात आले़ दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दुबार असलेली नावे यादीतून वगळावीत, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री सुरेश वरपूडकर, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, उपमहापौर माजू लाला, सभागृह नेते भगवान वाघमारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंजाबराव देशमुख, श्रीनिवास पेदापल्ली, असलम भाई आदींनी केली आहे़ दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांकडे ही तक्रार दाखल केल्यानंतर जिल्हास्तरावरील निवडणूक विभाग या प्रश्नी कोणती भूमिका घेतो याकडे जिल्हावसियांचे लक्ष लागले आहे़