परभणी: ५६ घरकुलांच्या विक्रीस मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:34 AM2019-06-29T00:34:43+5:302019-06-29T00:35:24+5:30
पूर्णा तालुक्यातील निळा येथील पूरग्रस्तांच्या पूनर्वसनानंतर शिल्लक राहिलेल्या एकूण ५६ घरकुलांची बाजारभावानुसार विक्री करण्यास शासनाची परवानगी मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पूर्णा तालुक्यातील निळा येथील पूरग्रस्तांच्या पूनर्वसनानंतर शिल्लक राहिलेल्या एकूण ५६ घरकुलांची बाजारभावानुसार विक्री करण्यास शासनाची परवानगी मिळाली आहे.
पूर्णा तालुक्यातील निळा या गावाचे पूनर्वसन झाले असून पूनर्वसित ठिकाणी घरकुलांची उभारणी करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांना घरकुल वितरित केल्यानंतर काही घरकुले शिल्लक राहिली असून त्यात १ हजार ५०० चौरस फूट भूखंडावरील ४७ आणि १ हजार चौरस फुटावरील ९ अशा ५६ घरकुलांचा समावेश आहे. या घरकुलांची बाजारभावानुसार विक्री करण्यास शासनाची परवानगी मिळाली आहे.
पूनर्वसनांतर्गत बांधलेली ही घरकुले निळा व परिसरातील रहिवासी असलेल्या कुटुंबप्रमुखांना निविदा सादर करण्यासाठी खुली आहे. चालू बाजारभावानुसार घरकूल विक्री करताना उपलब्ध घरकुलापेक्षा जास्त मागणी अर्ज प्राप्त झाल्या लॉटरी पद्धतीने घरकुलांचे वाटप करण्यात येईल.
१ हजार ५०० चौरस फुटासाठी बाजारमूल्याप्रमाणे ११ लाख ५७ हजार ३७६ तर १ हजार चौरस फुटासाठी ११ लाख २ हजार ५६ किंमतीचे घर व भूखंड मंजूर केला जाईल. घर मंजूर झालेल्या व्यक्तीस १५ दिवसांच्या आत रक्कम शासनास जमा करावी लागेल.
४निविदेसोबत रहिवासी असल्याचा पुरावा सादर करणे बंधनकारक राहणार आहे. निविदा भरताना १ हजार ५०० चौरस फुटासाठी १० टक्के म्हणजे १ लाख १५ हजार ७३६ रुपये व १ हजार चौरस फुटासाठी १ लाख १० हजार २०५ रुपयांचा धनादेश जिल्हा पूनर्वसन अधिकारी यांच्या नावाने जोडावा लागेल. अधिक माहितीसाठी जिल्हा पूनर्वसन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.